चिखली (Chikhli Medical student) : सध्याच्या डिजिटल व्यवहारांच्या काळात प्रामाणिकपणा जपणे ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. चिखली येथील एका तरुणीने स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध करत समाजात एक वस्तुपाठ घालून दिला आहे. शैलेश संजय पांगरे यांची गणेशोत्सवाच्या वाद्यसंगीताच्या मंडळासाठी आलेली रक्कम पंकज चौधरी यांच्या फोनवरून ट्रान्सफर करताना चुकीने एका मुलीच्या खात्यावर गेली होती. ती संपूर्ण रक्कम या विद्यार्थिनीने कोणतीही फसवणूक न करता मूळ मालकाला सुखरूप परत केली आहे.
नेमकी काय घडली घटना?
चोरवड (ता. भुसावळ, जि. जळगाव) येथील शैलेश संजय पांगरे यांची ७,००० रुपयांची रक्कम पंकज बापू चौधरी यांच्या फोनपे क्रमांकावरून (9764963542) ट्रान्सफर केली जात होती. ही गावातील गणपती उत्सवाची जमा झालेली वर्गणी असून ती वाद्यसंगीताच्या मंडळींना पाठवायची होती. मात्र नजरचुकीने एक अंक बदलल्यामुळे ही रक्कम चिखली (जि. बुलढाणा) येथील कु. ऋतुजा (ज्योती) केशव कोल्हे (द्वितीय वर्ष, एमबीबीएस विद्यार्थिनी, जीएमसी कोल्हापूर) यांच्या फोनपे क्रमांकावर (8308391668) ट्रान्सफर झाली. ही घटना दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३:४२ वाजता घडली.
गरिबाचा आधार आणि कुटुंबाचे संस्कार
सार्वजनिक वर्गणीचे पैसे चुकीच्या ठिकाणी गेल्यामुळे आणि घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे हे पैसे स्वतःच्या खिशातून भरून द्यावे लागतील या विचाराने संबंधित व्यक्ती अत्यंत हताश व निराश झाली होती.
मात्र, खात्यात अचानक अनोळखी व्यक्तीकडून पैसे जमा झाल्याचे समजताच कु. ऋतुजा यांनी कोणताही लोभ न धरता प्रामाणिकपणे ते पैसे परत करण्याचा निश्चय केला. त्यांनी तात्काळ ही बाब आपले वडील श्री. केशव एकनाथ कोल्हे सर यांच्या कानावर घातली. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०:२६ वाजता संपूर्ण ७,००० रुपयांची रक्कम परत करण्यात आली.
सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
सार्वजनिक वर्गणीचे पैसे सुखरूप परत मिळाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि कोल्हे परिवाराचे मनापासून आभार मानले. कु. ऋतुजा यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे व संवेदनशीलतेचे सर्व स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे. "चांगले संस्कार हीच खरी संपत्ती" हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.