भाजपाचे लखनसिंह ठाकूर यांच्या मागणीला जल व मृदासंधारण विभागाचा तत्पर प्रतिसाद
रिसोड (Chinchamba Pen Dam) : तालुक्यातील चिंचांबा-पेनगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात लाकडे, झाडे व काडी-कचरा अडकला होता. त्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह अडथळित होऊन परिसरातील शेतीला पाण्याचा धोका निर्माण झाला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजपाचे लखनसिंह ठाकूर यांनी जल व मृदासंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तात्काळ कचरा हटविण्याची मागणी केली होती. या मागणीची गांभीर्याने दखल घेत कार्यकारी अभियंता फेरवानी व उपविभागीय अधिकारी पंकज उगले यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे दुसऱ्याच दिवशी विभागाची यंत्रणा घटनास्थळी पोहोचवून पैनगंगा नदीवरील (Chinchamba Pen Dam) चिंचांबा पेन बंधाऱ्याजवळ पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेले अडकलेले लाकूड, झाडे व काडी-कचरा पूर्णपणे हटविण्यात आला. त्यामुळे आता नदीतील पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला असून पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यास मदत झाली आहे. या तातडीच्या कार्यवाहीमुळे किनखेडा, पेडगाव, मसालापेन व कवठा परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. बंधाऱ्याच्या परिसरातील शेतीचे संभाव्य नुकसान टळण्यास मदत झाली असून भविष्यात पाण्याचा प्रवाह अडथळित होण्याची शक्यताही कमी झाली आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न गांभीर्याने घेऊन अवघ्या एका दिवसात यंत्रणा कामाला लावून प्रत्यक्ष कार्यवाही केल्याबद्दल भाजपाचे लखनसिंह ठाकूर यांनी जल व मृदासंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता फेरवानी उपविभागीय अधिकारी पंकज उगले तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. “शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि त्यांच्या हिताचे संरक्षण हीच आमची प्राथमिकता असून, प्रशासनाने अशाच पद्धतीने तत्परतेने कार्यवाही करावी,” असे लखनसिंह ठाकूर यांनी यावेळी सांगितले.