रोजगार आंदोलनावरून शिवसेना-राष्ट्रवादीत संघर्ष; कंपन्यांना त्रास दिल्याचा आरोप, जशास तसे उत्तर देण्याचा थोरवेंचा इशारा
रायगड : जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. रोजगाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कंपन्यांवर दबाव आणून त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा दावा थोरवे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रोजगार आंदोलनावरून हा वाद अधिक तीव्र झाला. या आंदोलनामागे रोजगाराचा प्रश्न नसून स्वतःचा राजकीय फायदा साधण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला. आंदोलनाची वस्तुस्थिती लवकरच सर्वांच्या लक्षात येईल, असेही त्यांनी म्हटले.
खालापूर परिसरातील कंपन्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्रास दिला जात असल्याचा आरोपही थोरवेंनी केला. स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम या कंपन्यांकडून केले जाते. त्यामुळे कंपन्या बंद पाडण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांना दिला.
दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदावरूनही महायुतीतील अंतर्गत राजकारण यापूर्वी चर्चेत आले होते. मंत्री भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यात या पदासाठी रस्सीखेच असल्याची चर्चा होती. मात्र, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना सहकार्य केले.
या निवडणुकीत अनिकेत तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आला. त्यानंतर अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला. पुढे रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली.
याच राजकीय घडामोडींनंतर आमदार महेंद्र दळवी यांनी अनिकेत तटकरे यांच्यावरही टीका केली होती. शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेतला नसता, तर अनिकेत तटकरे यांचा राजकीय जन्मच झाला नसता, अशी टीका दळवी यांनी केली होती. त्यांनी अनिकेत तटकरेंना 'सरोगसी बाळ' असा उल्लेख करत निशाणा साधला होता.
कोकण विधानपरिषद निवडणुकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील या निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला.
शिवसेना शिंदे गटातील कोकणातील आमदारांनी सुरुवातीला ही निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे अनिकेत तटकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली.