जैन धर्मगुरू नम्रमुनी यांच्या सूचनेनुसार अनोखा अनुभव; सुरक्षाव्यवस्था, गाड्या आणि महागड्या वस्तूंपासून स्वतःला ठेवले दूर
मुंबई : ‘भिकारी’ चित्रपटातील कथानकाची आठवण करून देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे आमदार पराग शाह चक्क भिकाऱ्याच्या वेशात मुंबईतील रस्त्यांवर फिरताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेल्या आमदारांना अशा अवतारात पाहून सुरुवातीला अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र, त्यामागील कारण समोर आल्यानंतर या अनोख्या प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे.
जैन धर्मीयांचा सध्या चातुर्मास सुरू आहे. याच काळात जैन धर्मगुरू नम्रमुनी यांच्या सांगण्यावरून पराग शाह यांनी एक दिवस भिकाऱ्याप्रमाणे जीवन जगण्याचा अनुभव घेतल्याचे समोर आले आहे. गुरूंच्या सूचनेनुसार त्यांनी नेहमीची सुरक्षाव्यवस्था, वाहनांचा ताफा आणि महागड्या वस्तू यांपासून अंतर ठेवत हा अनुभव घेतला.
Param Pujya Namramuni Gurudev is currently in Ghatkopar for his grand 2026 Chaturmas.
— GoldenEye_6 (@GoldenEye_6) September 14, 2026
MLA Parag Shah has given his newly built flat schemes to all the devotees for residing, who have come from all over India.
Salute to this man. pic.twitter.com/o11ZUQkw3y
यानंतर शाह यांनी भिकाऱ्याचा वेश परिधान करून घाटकोपर परिसरातील रस्त्यांवर काही तास घालवले. रस्त्यावर बसणे, नागरिकांकडून भीक मागणे आणि त्यातून अन्न घेणे, अशा प्रकारे त्यांनी सामान्यतः गरजू व्यक्तींना येणाऱ्या परिस्थितीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे, या काळात रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या अनेक नागरिकांना त्यांच्या वेशातील व्यक्ती म्हणजे आमदार पराग शाह आहेत, याची कल्पनाही आली नाही. मेकअप आणि वेशभूषेमुळे त्यांचा संपूर्ण लूक बदलला होता. त्यामुळे नेहमी सुरक्षारक्षक आणि वाहनांच्या ताफ्यासह दिसणाऱ्या शाह यांना ओळखणे नागरिकांना शक्य झाले नाही.
या प्रयोगामागे सामान्य नागरिक, विशेषतः गरजू आणि वंचित घटकांचे दैनंदिन जीवन जवळून समजून घेणे, हा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. शाह ज्या-ज्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी त्यांनी नंतर मेकअप काढून पुन्हा भेट दिली आणि तेथील संबंधित नागरिकांशी संवाद साधला. या संपूर्ण अनुभवाचे चित्रीकरण करण्यात आले असून त्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
दरम्यान, २०२४च्या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पराग शाह यांनी ३,३८३ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली होती. त्यामुळे ते महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते. रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित असलेले शाह यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणूनही कार्यरत होते.
कोट्यवधींची संपत्ती आणि राजकीय पद असतानाही भिकाऱ्याचा वेश धारण करून रस्त्यावर काही तास घालवण्याच्या त्यांच्या या प्रयोगामुळे आता मुंबईसह राजकीय वर्तुळातही विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.