१४ सप्टेंबर सकाळी ६ ते १५ सप्टेंबर सकाळी ७ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल; वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर
नागपूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. सोमवारी, १४ सप्टेंबर रोजी गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात आगमन होणार असून, त्यानिमित्त महाल आणि चितार ओळी परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने काही मार्गांवर वाहतुकीचे निर्बंध लागू केले आहेत.
महाल परिसरातील चितार ओळी हे गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कलावंतांचे प्रमुख केंद्र आहे. गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतीच्या मूर्ती घेण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने या परिसरात येतात. भावसार चौक ते बडकस चौक हा रस्ता अरुंद असल्याने गर्दीच्या काळात येथे वाहतूक कोंडी होण्यासोबतच लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत एकूण २५ तासांसाठी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
चितार ओळी मार्गावर एकेरी वाहतूक
या कालावधीत बडकस चौकातून चितार ओळीमार्गे भावसार चौकाच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र, भावसार चौकातून चितार ओळीमार्गे बडकस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी विविध पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. भावसार चौकातून बडकस चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी चितार ओळीमार्गे जाण्याऐवजी भावसार चौकातून गांधी पुतळा चौक आणि त्यानंतर बडकस चौक असा मार्ग वापरावा.
दरम्यान, गांधी पुतळा चौकातून बडकस चौक ते शहीद चौक आणि शहीद चौक ते बडकस चौक या दोन्ही दिशांमधील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
बडकस चौकाकडून येणाऱ्या वाहनांची वाहतूक चिटणीस पार्कमार्गे अग्रसेन चौकाच्या दिशेने वळवण्यात आली आहे. तर शहीद चौकाकडून येणाऱ्या वाहनांना दारोडकर चौकाच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येणार आहे.
परिस्थितीनुसार वाहतूक वळवण्याचे अधिकार
गणेशमूर्तींच्या आगमनादरम्यान प्रत्यक्ष ठिकाणी निर्माण होणारी गर्दी, वाहनांची संख्या किंवा वाहतूक कोंडीची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार वाहतुकीच्या मार्गात तातडीने बदल करण्याचे अधिकार घटनास्थळी तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत.
गणेशभक्तांना पोलिसांचे सहकार्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाल आणि चितार ओळी परिसरात येणाऱ्या नागरिकांनी तसेच गणेशभक्त आणि वाहनधारकांनी पोलिसांच्या वाहतूक नियोजनाला सहकार्य करण्याचे आवाहन नागपूर शहर पोलिसांनी केले आहे. निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन करावे आणि रस्त्यांवर अनावश्यक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही पोलिसांनी सांगितले आहे. गणरायाचे आगमन वाहतुकीच्या अडथळ्याविना आणि उत्साही वातावरणात पार पडावे, यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.