मल्टी-लेयर साऊंड सिस्टीम लावणारी वाहने सीलबंद होणार; नियमांनुसार ध्वनीमर्यादा पाळणाऱ्या सामान्य साऊंड सिस्टीमला सूट
नागपूर शहरात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली असून, डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमवर बंदी घालण्यात आली आहे. ही अधिसूचना ३ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून १ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.
सण आणि उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीममुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. मंडळांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्ष, संघटनांचे नेते, कार्यकर्ते तसेच पोलिस प्रशासन यांच्यात तणाव निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर ध्वनीमर्यादेचे उल्लंघन होण्याची शक्यताही असते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी डीजे आणि अवाजवी ध्वनीप्रणालीविरोधात ही कारवाई केली आहे.
मल्टी-लेयर साऊंड सिस्टीमवरही कारवाई
अधिसूचनेनुसार, टॉप, मिड आणि बेस अशा मल्टीस्पीकर सिस्टीमसोबत प्लाझ्मा साऊंड सिस्टीम आणि प्रेशरमिड साऊंड सिस्टीमचे थरावर थर लावून वाहनांवर भिंतीसारखी रचना उभारण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. अशा साऊंड सिस्टीमसाठी वाहनांच्या मूळ रचनेत बेकायदेशीर बदल केले जात असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
अशा प्रकारची मल्टी-लेयर साऊंड सिस्टीम वापरण्यासाठी आणलेली किंवा त्यासाठी वाहनाच्या मूळ रचनेत बदल केलेली वाहने आढळल्यास पोलिसांकडून ऑन स्पॉट कारवाई केली जाणार आहे. संबंधित वाहने सीलबंद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नियम पाळणाऱ्या साऊंड सिस्टीमला सूट
दरम्यान, ही बंदी प्रत्येक प्रकारच्या साऊंड सिस्टीमवर लागू नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शासनाने निश्चित केलेल्या अधिकृत ध्वनीमर्यादेचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या सामान्य साऊंड सिस्टीमला या अधिसूचनेतून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे नियमांच्या चौकटीत राहून वापरल्या जाणाऱ्या साऊंड सिस्टीमवर ही कारवाई लागू होणार नाही.
नागपूरचे विधानपरिषदेचे माजी आमदार आणि माजी महापौर संदीप जोशी यांनी डीजे बंदीसाठी पुढाकार घेतला आहे. विविध सण-उत्सवांमध्ये डीजेमुळे होणारा मोठा आवाज तसेच घातक लेझर लाईटमुळे नागरिकांच्या कानांवर आणि डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही धर्माचा सण किंवा उत्सव असला तरी डीजे आणि लेझर लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी असावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संदीप जोशी म्हणाले...
नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी १ नोव्हेंबरपर्यंत डीजे बंदीचा घेतलेला निर्णय हा आपल्या चळवळीचा अंशतः विजय असल्याचे संदीप जोशी यांनी म्हटले आहे. डीजेपासून कायमस्वरूपी मुक्तीसाठी पुढेही काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गृह विभागाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचेही जोशी यांनी सांगितले. मात्र, पोलीस आयुक्तांच्या आदेशात मिरवणुकीमध्ये डीजेच्या वापरावर बंदी असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे स्थिर ठिकाणी किंवा मिरवणुकीत कुठेही डीजे वापरण्यास बंदी असावी, अशी मागणी घेऊन पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचे संदीप जोशी यांनी म्हटले आहे.