मुलांसमोर मारहाण केल्याचा आरोप; पोस्टमार्टममध्ये मानेचे हाड आणि आतड्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समोर
नागपुरात कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसक घटनेत होऊन 38 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोसायटीमधील डान्स क्लासला जाण्यावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर पतीने पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या यामिनी कृष्ण लाल यादव यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी पती कृष्ण लाल यादव याला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याला दोन लहान मुले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, कृष्ण लाल कामावरून घरी आल्यानंतर त्याने पत्नी यामिनीला स्वतःसह मुलांसाठी जेवण तयार करण्यास सांगितले. त्यावेळी यामिनी सोसायटीतील डान्स क्लासला जाण्याच्या तयारीत होती. तिने स्वयंपाक करण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. काही वेळातच हा वाद वाढत जाऊन मारहाणीपर्यंत पोहोचला.
घटनेच्या वेळी कृष्ण लाल मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याने दोन मुलांसमोरच यामिनीच्या मानेवर आणि पोटावर मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर यामिनीला मानेसह पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिने पतीला पेनकिलर आणण्यास सांगितले.
यानंतर कृष्ण लाल औषध आणण्यासाठी मेडिकल दुकानात गेला. मात्र, ते दुकान बंद असल्याने तो औषध न घेताच घरी परतला. दरम्यान, यामिनीची प्रकृती अधिकच बिघडत गेली. तिच्या पोटावर सूज आली आणि वेदनाही वाढत गेल्या.
त्यानंतर यामिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शरीरातील गंभीर अंतर्गत दुखापतींमुळे उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून केली होती. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
शवविच्छेदन अहवालातून यामिनीच्या शरीरावर गंभीर दुखापती झाल्याचे स्पष्ट झाले. मानेचे हाड मोडल्याचे, तसेच आतड्यांना गंभीर इजा झाल्याचे अहवालातून समोर आल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी कृष्ण लाल यादवची चौकशी केली. चौकशीअंती त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.