आमदार बसवराज पाटील : महापालिकेची घेतली आढावा बैठक
लातूर : शहरातील रखडलेली विकासकामे तातडीने मार्गी लावावीत, नागरिकांच्या मूलभूत समस्यांना प्राधान्य द्यावे आणि कामांचा निश्चित कालबद्ध कृती आराखडा तयार करून काम करावे, अशा सूचना आमदार बसवराज पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. लातूर महानगरपालिकेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत रस्ते, पाणीटंचाई, पावसाळी नाले, ड्रेनेज आणि दुष्काळी परिस्थिती यांसह विविध नागरी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत मंजूर निधी, वर्क ऑर्डरची तारीख, काम पूर्ण करण्याची मुदत आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचे नाव या तपशिलासह विभागनिहाय माहिती घेऊन कामांचा ३० दिवस, ९० दिवस आणि ६ महिन्यांचा अॅक्शन प्लॅन तयार करण्याबाबत चर्चा झाली. शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेताना पाणी वितरणातील अंतर, पाईपलाईन गळती रोखणे आणि कमी दाबाने पाणी मिळणाऱ्या भागांचा प्रश्न यावर लक्ष केंद्रित करण्यात आले; तसेच आगामी उन्हाळा लक्षात घेता दुष्काळी परिस्थितीसाठी आवश्यक नियोजन करण्याचे सांगण्यात आले. खोरी गल्ली येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर उघड्या नाल्यांना तातडीने संरक्षक व्यवस्था करणे आणि शाळा व वस्ती भागातील अशा ठिकाणांना प्राधान्य देण्याबाबत निर्देश देण्यात आले.
महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वस्तू व सेवा कर परतावा तसेच अनुदानाचा प्रश्न राज्यस्तरावर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच शहराच्या प्रलंबित विकासकामांच्या मंजुरीसाठी आणि अतिरिक्त निधीसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून हे प्रश्न सोडवले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त वसुधा फड, उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांच्यासह भीमाशंकर बेंबळकर, रवीशंकर जाधव, नगरसेवक गिरीश पाटील, प्रविण कस्तुरे, ॲड. मोरे, गणेश गवारे, ऋषिकेश राजे, नगरसेविका रागिणीताई यादव, करुणाताई शिंदे, शोभाताई पाटील, सत्यवतीताई चेवले, संगिताताई मुरचे, शीतलताई पाटील, मुख्य लेखाधिकारी रावसाहेब कोलगने, शहर अभियंता उषाताई काकडे यांच्यासह उद्धव तेलंग व पालिकेचे विविध विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.