मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह सहा जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू
मुंबईतील घाटकोपर पश्चिम परिसरात मुसळधार पावसामुळे भीषण दरड दुर्घटना घडली असून मृतांचा आकडा ६ वर पोहोचला आहे. चिरागनगर येथील गौशिया चाळीवर मध्यरात्री दरड कोसळल्याने ३ ते ४ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या दुर्घटनेतील सर्व मृत एकाच कुटुंबातील असून त्यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे ३ ते ३.३० वाजताच्या दरम्यान परिसरातील नागरिक गाढ झोपेत असताना अचानक दरड कोसळली. काही क्षणांतच माती व दगडांचा मोठा ढिगारा घरांवर आल्याने अनेक जण त्याखाली अडकले. सुरुवातीला दोन मृत्यूंची नोंद झाली होती; मात्र बचावकार्य सुरू असताना आणखी चार मृतदेह बाहेर काढण्यात आले.
#WATCH | Mumbai: A landslide occurred at Gaushiya Chawl, Chirag Nagar, near Rathod Medical in Kurla, at around 3:48 am. Two bodies have been recovered, and 6-8 persons are likely to be trapped. Rescue operation is underway.
— ANI (@ANI) August 12, 2026
(Source: NDRF) pic.twitter.com/aiDt2V38nZ
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, घाटकोपर पोलिस आणि संबंधित वॉर्डचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्रीपासून सुरू असलेले बचावकार्य अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली आणखी काही नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून प्रत्येक भागाची काळजीपूर्वक तपासणी केली जात आहे.
Mumbai, Maharashtra: The rescue operation is underway following a landslide in Ghatkopar. Two more bodies have been recovered, taking the total number of bodies recovered from the site to four pic.twitter.com/Iem8vHjEtH
— IANS (@ians_india) August 12, 2026
दरम्यान, या दुर्घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ३ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत.
या घटनेमुळे चिरागनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, पावसापूर्वी पालिकेने दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नोटीस बजावूनही काही नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती त्यांनी दिली.