Landslide

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंकला मुसळधार पावसाचा फटका; दरड कोसळल्याने वाहतूक बंद, रेल्वे सेवाही विस्कळीत

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंकला मुसळधार पावसाचा फटका; दरड कोसळल्याने वाहतूक बंद, रेल्वे सेवाही विस्कळीत

Landslide

टनल क्रमांक २ च्या बाहेर दरड कोसळल्याने पाणी व मातीचा लोंढा; एमएसआरडीसीकडून वाहतूक वळवली, रोहित पवार यांचा सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. सोमवारी (६ जुलै) पहाटे खोपोली-कुसगाव मिसिंग लिंक मार्गावरील टनेल क्रमांक २ च्या पुणे-मुंबई मार्गिकेच्या बाहेरील भागात दरड कोसळल्याने सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करून पर्यायी मार्गाने वळवली. या घटनेमुळे रस्ते वाहतुकीबरोबरच मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे टनेलच्या प्रवेशद्वाराजवळील स्लॅबचा काही भाग खचला. त्यानंतर डोंगरावरील माती आणि पाण्याचा मोठा प्रवाह बोगद्यामध्ये शिरल्याने छतावरून माती व पाणी थेट रस्त्यावर कोसळू लागले. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, टनेलच्या खडकाळ भिंतींवरून वेगाने वाहणारे पाणी आणि मलबा हटविण्याचे काम सुरू असल्याचे दृश्य त्यामध्ये दिसत आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे टनेल क्रमांक २ च्या बाहेरील भागात दरड कोसळल्याने सोमवारी पहाटे ४ वाजल्यापासून पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने वळविण्यात आली आहे. महामार्ग वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, मलबा हटविण्याचे आणि मार्ग सुरक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दोन महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला सुमारे १३ किलोमीटर लांबीचा हा मिसिंग लिंक प्रकल्प सह्याद्री पर्वतरांगांमधून तयार करण्यात आला आहे. या मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासाचे अंतर सुमारे सहा किलोमीटरने कमी होत असून, प्रवासासाठी लागणारा वेळ अंदाजे २५ ते ३० मिनिटांनी घटतो.

याआधीही या नव्या मार्गावर खड्डे पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर आता दरड कोसळल्याच्या घटनेमुळे प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सततच्या पावसामुळे लोणावळा, तळेगाव आणि घाट परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. परिणामी डोंगरकड्यांवरून माती घसरून येण्याच्या घटना वाढल्या आहेत. वाहतूक बंद झाल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, लोणावळा घाट परिसरात अनेक तास वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अनेक वाहनचालक महामार्गावर अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे.

प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय नवीन तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. घटनास्थळी संबंधित यंत्रणांकडून पाहणी सुरू असून, मलबा पूर्णपणे हटवून मार्ग सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. ठाकूरवाडी आणि मंकी हिल लूप केबिनदरम्यान दक्षिण-पूर्व घाट विभागातील अप मेन मार्गावर दरड कोसळल्याने अनेक रेल्वे सेवा रद्द किंवा वळविण्यात आल्या. यामध्ये इंद्रायणी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस तसेच अनेक इंटरसिटी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी परिस्थितीचा आढावा घेत पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती दिली. मुसळधार पाऊस सुरू असतानाही पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून रेल्वे सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवरून राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. "मिसिंग लिंकवर आधी durability तपासण्यासाठी खड्डे पडले, आता durability तपासण्यासाठी दरड कोसळली आहे का? मिसिंग लिंकच्या कामात दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाली असून सुरक्षाच मिसिंग झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या पावसाने सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली असून जनतेसमोर भ्रष्टाचार उघड झाला आहे. या सरकारला जनता माफ करणार नाही," अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

जिल्हा माहिती कार्यालयानेही नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुना मुंबई-पुणे महामार्ग दोन्ही ठिकाणी वाहतुकीवर गंभीर परिणाम झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

संबंधित सामग्री

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. मुंबईसह काही भागांतून माघार; पुढील २-३ दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्याची शक्यता.

Oct 03, 2026
१ ऑक्टोबरपासून मुंबईतील टोल महागला; ट्रक-बसमागे ३५ रुपये अधिक

१ ऑक्टोबरपासून मुंबईतील टोल महागला; ट्रक-बसमागे ३५ रुपये अधिक

मुंबईतील ५ टोलनाक्यांवर १ ऑक्टोबरपासून टोलवाढ लागू झाली. मिनी बस, ट्रक, बस आणि अवजड वाहनांसाठी नवे दर जाणून घ्या.

Oct 01, 2026
उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

उत्तर प्रदेशात अतिवृष्टीमुळे 56 मृत्यू, 1,020 घरांचे नुकसान; ओडिशात महानदीला पूराचा धोका, ऋषिकेश राफ्टिंग बंद.

Sep 28, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड आणि धाराशिवमध्ये पावसाचा इशारा.

Sep 28, 2026