पद्मश्री पोपटराव पवार : जलसमृद्ध अभियानाची कवळी येथे पाहणी
औसा : औसा तालुक्यातील सात गावांमध्ये सुमारे १० किलोमीटर नाला खोलीकरण व सरळीकरणाचे झालेले काम हे मोठे आणि दिशादर्शक काम असून, या गावांना राज्यातील मॉडेल गावे बनविण्यासाठी राजकीय पाठबळाबरोबरच शासकीय यंत्रणेचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
दि. ६ सप्टेंबर रोजी औसा तालुक्यातील कवळी येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून ‘जलसमृद्ध औसा अभियान’ अंतर्गत करण्यात आलेल्या नाला खोलीकरण व सरळीकरणाच्या जलसंधारण कामांची पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी प्रधान सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, लातूर मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, तहसीलदार घनश्याम अडसूळ, श्रीनाथ संस्थांचे राजेंद्र गिरी महाराज, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. परीक्षित पवार, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, सरपंच राहिबाई जगताप, सदाशिव जोगदंड, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, पंचायत समिती सभापती गंगाबाई कोदळीकर, उपसभापती अमोल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पोपटराव पवार म्हणाले की, राजकीय नेतृत्व आणि शासकीय यंत्रणा एकाच दिशेने काम करत असतील तर त्यातून राज्यासमोर नवीन आणि प्रभावी मॉडेल उभे राहू शकते. औसा तालुक्यातील जलसमृद्ध अभियान हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पाणी अडवा आणि पाणी जिरवा या अभियानाचा पहिला टप्पा या सात गावांनी पूर्ण केला आहे. मात्र, आता कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची जबाबदारी आणखी वाढली आहे. उपलब्ध झालेले पाणी योग्य पद्धतीने वापरले नाही, तर भविष्यात पुन्हा टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे जास्त पाण्याची गरज असलेली पिके घेणे टाळावे तसेच अनावश्यकपणे बोअरवेल घेऊ नयेत, असा सल्ला पवार यांनी दिला. हिवरेबाजारच्या विकासाचे गमकही याच दोन गोष्टींमध्ये आहे. पाणी अडविणे आणि उपलब्ध पाण्याचा विवेकपूर्ण वापर करणे, असे त्यांनी स्पष्ट केले.
लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या जलसंधारणाच्या उपक्रमाला जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य देण्यात येत असल्याचे सांगितले. कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योगाबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. जलसमृद्ध औसा अभियानांतर्गत विकसित होत असलेल्या या सात गावांना राज्यातील आदर्श गावे म्हणून पुढे आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. परीक्षित पवार यांनी जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड आवश्यक असल्याचे सांगितले.
योजनांचा लाभ घेणे नागरिकांचे कर्तव्य : डॉ. पुलकुंडवार
प्रधान सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान अधिक सुकर करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. गावातील प्रत्येक नागरिकाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी विविध उपक्रम आखण्यात आले आहेत. नागरिकांनी या योजना समजून घेणे, आपले हक्क जाणून घेणे आणि गावातील योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करून घेणे, हे त्यांचे कर्तव्य आहे.