पेट्रोल पंप चालकांच्या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला इशारा
हिंगोली (Petrol fuel supply) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली २९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल पंप चालकांची आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील पेट्रोलियम पदार्थांची उपलब्धता व पुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांच्यासह आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल तसेच नायरा या तेल कंपन्यांचे सेल्स ऑफिसर उपस्थित होते.
बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पेट्रोल पंप चालक आणि मालकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. (Petrol fuel supply) अत्यावश्यक सेवा, आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, शासकीय यंत्रणा तसेच जीवनावश्यक सेवांसाठी आवश्यक इंधनाचा पुरवठा २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावयाची शासकीय कामे, सार्वजनिक बांधकामे, जलसंधारण, रस्ते दुरुस्ती तसेच इतर अत्यावश्यक कामांसाठी कंपनीने निर्धारित केलेल्या नियम व विहित कार्यपद्धतीनुसार डिझेलचा पुरवठा करण्यास सांगण्यात आले. सध्याची ग्राहकांची गर्दी व उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांसाठी पेट्रोल पंपावर पिण्याचे स्वच्छ पाणी, सावलीसाठी प्रतीक्षा व्यवस्था, स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले.
तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देणे, प्राथमिक उपचार पेटी ठेवणे आणि गर्दी नियोजनासाठी आवश्यक कर्मचारी व सूचना फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. इंधन वितरणाचे नियोजन शक्यतो सकाळच्या वेळेत करावे जेणेकरून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनास आवश्यक सहाय्य व समन्वय प्रभावीपणे करता येईल. इंधन वितरणाबाबत पारदर्शकता राखून अनावश्यक गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तेल कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर व संबंधित अधिकार्यांना देखील जिल्हाधिकार्यांनी सूचना दिल्या.
सध्याच्या परिस्थितीत शेतकर्यांची शेतीविषयक कामे व इतर अत्यावश्यक सेवांचा विचार करून रविवारी देखील डेपो कार्यरत ठेवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. ज्या पेट्रोल पंप चालकांनी आगाऊ मागणी नोंदवून आवश्यक रक्कम जमा केलेली आहे, त्यांना वेळेवर इंधन उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, असे सांगण्यात आले. पेट्रोल पंपांना मागणीनुसार नियमित व वेळेवर पुरवठा करून (Petrol fuel supply) कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले. सुरळीत इंधन पुरवठ्यामुळे शेतीची कामे, अत्यावश्यक सेवा व सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी होईल तसेच गर्दी व आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या समारोपात जिल्हाधिकारी गुप्ता यांनी जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन, तेल कंपन्या व पेट्रोल पंप चालक यांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन केले.
त्याचबरोबर नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठेबाजी करू नये तसेच आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या बैठकीत अप्पासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, पेट्रोल विक्रेता संघटनेचे पदाधिकारी सुमित चौधरी, कैलास बांगर, ललीत खुराणा, अजिक्य देशपांडे, राजेश बगडीया, गोपाल चौधरी, राहुल नाईक,विलास काळे, अनिल वर्मा, सुनिल पाटील, अॅड.सुनिल भुक्तर, हमीद भाई प्यारेवाले, राजु देशमुख, गणेश चौधरी, सुरेंद्र सावत, यांच्यासह जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांची उपस्थिती होती.