मानोरा-मंगरूळपीर महामार्गावरील घटना; ६ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मानोरा (Arunavati Petrol Pump Assault Case) : मानोरा - मंगरूळपीर राष्ट्रीय महामार्गाच्या रोडवरील आमगव्हाण गावाजवळ असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव अमोल पाटणकर यांच्या अरुणावती पेट्रोल पंपावर रात्रीच्या सुमारास कामगाराला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी कामगार जीवन गोवर्धन मेहल्डे (राहणार आमगव्हाण) याने दिलेल्या तक्रारीवरून ६ आरोपींना अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार मानोरा - मंगरूळपीर राष्ट्रीय महामार्गाच्या रोडवर आमगव्हाण गावाजवळ सीएमओ अमोल पाटणकर यांचे पेट्रोल पंप आहे. शनिवारी रात्री ९.१५ च्या सुमारास मुबारक रमजान परसुवाले, जिब्रान अशपाक फकीरावाले, हसीना मोहम्मद भगतवाले, शाहिस्ता मुबारक परसुवाले, परविन रफिक पप्पूवाले व शब्बू अशपाक फकीरावाले सर्व राहणार गवळीपुरा तालुका दिग्रस आरोपींनी गैर कायदेशीररित्या जमाव करून फिर्यादी व जखमी व्यक्तीला जीवाने मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने मारहाण केली.
तसेच आरोपींनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून लाटा बुक्क्यांनी मारले आणि जीवने मारण्याची धमकी दिली. (Arunavati Petrol Pump Assault Case) घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे आणि पोलीस निरीक्षक नैना पोहेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची फॉरेन्सिक यांनीही तपासणी केली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९(१), २९६, ११५ (२), ३५२, ३५१(२) (३), १८९(२), १९१(२)(३),१९० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामबाबू सरोदे हे करीत आहे. महामार्गावर रात्रीच्या वेळी अशा घटना वाढत असल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.