हिंगोली (Hingoli LIGO Project) : हिंगोली येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय लिगो प्रकल्पासाठी तयार होणाऱ्या मुख्य पोच रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याचा आरोप करत दुघाळा, बोरजा आणि पिंपळ परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी 14 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश जोशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी माजी समाजकल्याण आयुक्त दीपकराव वडकुते, डॉक्टर रमेश मस्के, भास्कर पोले, गोपाल सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्त्यासाठी मूळ मंजूर करण्यात आलेला आराखडा आणि प्रत्यक्षात सुरू असलेले रुंदीकरणाचे काम यांच्यात मोठी तफावत आहे. त्यामुळे अनेकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त जमीन बाधित होत आहे. याशिवाय प्रत्यक्षात ताब्यात घेतल्या जाणाऱ्या जमिनींचे गट क्रमांक, मोजमाप आणि सातबाऱ्यावरील नावांमध्येही तफावत दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवेदनात बाधित शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही प्रकारचा कायदेशीर मोबदला न मिळाल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. मोबदला आणि पुनर्वसनाबाबत प्रशासनाने तात्काळ स्पष्टता द्यावी आणि योग्य भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत जमिनींची मोजणी दुरुस्त केली जात नाही आणि मोबदल्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम तात्पुरते स्थगित ठेवावे अशी विनंतीही करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या या (Hingoli LIGO Project) निवेदनाची गांभीर्याने दखल घेत कार्यकारी अभियंता श्री. सुरेश जोशी यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिले. निवेदनातील मुद्द्यांची छाननी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. LIGO सारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामात पारदर्शकता ठेवून बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.