जादूटोण्याचा विधी केल्याचा आरोप; POCSO आणि जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल, फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची तयारी
सातारा : फलटणमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मुलीच्या अंगात भूत शिरल्याचे भासवून तिच्यावर जादूटोण्याचे विधी करण्यात आले आणि त्यानंतर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सौरभ नाना मदने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या अंगातील कथित भूत काढण्याच्या बहाण्याने संशयिताने बाहुली, लिंबू आणि चामडी गोफणीचा वापर करून अघोरी विधी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलीला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्ती केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात POCSO कायदा आणि जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची तयारी
या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले. प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुटुंबीयांना धमकीचे पत्र
दरम्यान, या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पीडितेच्या घराबाहेर अघोरी विद्या केल्याचे दिसणारे साहित्य, लिंबू तसेच जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र ठेवण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
या प्रकरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनीही पोलीस प्रशासनाला निवेदन दिले असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांत अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांच्या कारनाम्यांशी संबंधित प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमधील अशा घटनांकडे लक्ष वेधले गेले होते. फलटणमधील या घटनेमुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांचा मुद्दा चर्चेत आला आहे.