मानोरा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक; कायदा-सुव्यवस्था राखण्यासह सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याच्या सूचना
मानोरा : आगामी गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर १२ सप्टेंबर रोजी मानोरा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गणेश मंडळांनी डीजेचा दणदणाट टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, अशा स्पष्ट सूचना कारंजा लाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांनी दिल्या.
शांतता समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी एसडीपीओ मनीष ठाकरे होते. यावेळी ठाणेदार नैना पोहेकर, गट विकास अधिकारी ज्योती राजपुरोहित, वैद्यकीय अधिकारी सरोदे मॅडम, नायब तहसीलदार मधुकर अष्टुरे आणि नगर पंचायतचे प्रतिनिधी ढोरे यांच्यासह अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

गणेशोत्सव हा धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक सलोखा आणि संस्कृती जपणारा उत्सव असल्याने या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे संदेश, अफवा अथवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अशा पोस्टपासून सतर्क राहावे, अशाही सूचना पोलिसांनी दिल्या. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे देखावे, घोषवाक्ये किंवा कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले.
गणेशोत्सव केवळ मनोरंजन आणि ध्वनिप्रदूषणावर केंद्रित न राहता सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणारा असावा, असे डिवायएसपी ठाकरे यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले. गणेश मंडळांनी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर यांसारख्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे, असेही त्यांनी आवाहन केले.
यावेळी उपस्थित अधिकारी, पोलीस पाटील आणि मान्यवरांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक बांधिलकीची जोड कायम ठेवावी तसेच नागरिक आणि प्रशासनाने एकत्रितपणे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीदरम्यान गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी वीज, रस्ते यासह विविध समस्या प्रशासनासमोर मांडल्या. बैठकीला शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे अध्यक्ष व सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलीस रमेश पवार, मदन पुणेवार, दत्तात्रय भावके, जयदीप पवार, राधेश्याम महले यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. संचालन व आभार प्रदर्शन पोलीस पाटील वासुदेव सोनोने यांनी केले.
पारंपरिक, सुसंस्कृत आणि शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वाढला पाहिजे. गणेशोत्सव पारंपरिक, सुसंस्कृत, शिस्तबद्ध आणि शांततेत साजरा करण्यासाठी गणेश मंडळे, नागरिक आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन ठाणेदार नैना पोहेकर यांनी प्रास्ताविक मनोगतातून केले.