पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश; पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाचा दीर्घ खंड, पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचेही नियोजन
पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पुणे जिल्ह्यातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतल्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भातील पहिली अधिसूचना येत्या तीन दिवसांत काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यात यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिल्याने अनेक ठिकाणी दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. पावसातील खंडाचा थेट फटका बळी राजाच्या खरीप पिकांना बसत असून, शेतीसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांच्या दौऱ्यादरम्यान भरणे यांनी देऊळगाव, मोरगाव, मुर्टी, नावळी आणि कोळविहीरे या गावांना भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची स्थिती, जमिनीतील ओलावा आणि उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला. पावसात पडलेल्या खंडामुळे पिकांवर झालेल्या परिणामाबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडून थेट माहिती जाणून घेतली. या दौऱ्यात आमदार राहुल कुल आणि पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी परिस्थितीबाबत चिंता करू नये, शासन त्यांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. पिकांच्या नुकसानीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाच्या खंडाची स्थितीही कृषिमंत्री भरणे यांनी स्पष्ट केली. हवेली, जुन्नर, आंबेगाव, मावळ आणि मुळशी येथे दोन ते तीन आठवड्यांपासून पावसाचा खंड आहे. भोर आणि वेल्हा तालुक्यांत हा कालावधी तीन ते चार आठवड्यांपर्यंत पोहोचला आहे. तर बारामती, शिरूर, पुरंदर, इंदापूर, दौंड आणि खेड या तालुक्यांमध्ये चार आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड नोंदवण्यात आला आहे.
दीर्घकाळ पाऊस न झाल्यामुळे खरीप पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ उपलब्ध आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्यावर शासनाने भर दिला आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राची अचूक नोंद घेऊन त्यानुसार पुढील मदतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून, कृषी आणि संबंधित विभागांकडून प्रत्यक्ष क्षेत्राची पाहणी केली जात आहे. पावसाचा खंड, पिकांची सद्यस्थिती आणि उपलब्ध पाण्याची परिस्थिती यांचा विचार करून पंचनामे तसेच आवश्यक प्रस्तावांची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित राहू नये, यासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी चारा याबाबतही नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याआधारे मदतीची प्रक्रिया पुढे नेण्यात येणार असून, येत्या तीन दिवसांत शेतकरी मदतीसंदर्भातील पहिली अधिसूचना काढण्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.