कुराश आणि ड्रॅगनबोटच्या खोट्या प्रमाणपत्रांचा वापर; दोघांना अटक, ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी
पुणे : पुणे शहर पोलिस दलातील २०२४-२६ या वर्षातील पोलिस भरती प्रक्रियेत बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'कुराश' या पारंपरिक कुस्तीच्या तसेच 'ड्रॅगनबोट' या सामूहिक नौकानयनाच्या खेळांची बनावट प्रमाणपत्रे तयार करून महाराष्ट्र सरकारकडून खेळाडूंसाठी लागू असलेल्या ५ टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात १९ उमेदवारांनी पोलिस दलात नोकरी मिळवल्याची माहिती समोर आली असून, गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश विठ्ठल नागर (वय ४०, रा. चंडीगड, मूळ रा. अहिल्यानगर) आणि सचिव शिवाजी साळुंखे (वय ४६, रा. फुरसुंगी) यांचा समावेश आहे. न्यायालयाने दोघांनाही ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात परभणी जिल्हा संघटक कल्याण बालासाहेब मुरकुटे, धाराशिव जिल्हा संघटक चांदपाशा लालासाहेब शेख, इतर जिल्ह्यांचे संघटक तसेच अन्य आरोपींविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने पुराव्यांसह तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकाराचा तपास सुरू झाला. पुणे शहर पोलिस दलातील २०२४-२६ या वर्षातील भरतीत १९ उमेदवारांनी 'कुराश' आणि 'ड्रॅगनबोट' खेळांची बनावट प्रमाणपत्रे सादर करून नोकरी मिळवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यापैकी ९ उमेदवार प्रशिक्षणासाठी गेल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.
तपासादरम्यान २०१६ ते २०२६ या कालावधीत कोणतीही स्पर्धा आयोजित न करता बनावट कागदपत्रे आणि क्रीडा अभिलेख तयार केल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. शिवाजीनगर येथील पोलिस मैदानावर भरतीच्या वेळी ही बनावट प्रमाणपत्रे सादर करून सरकारची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात पोलिस दलातील तसेच क्रीडा विभागातील काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे. संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, बनावट प्रमाणपत्रांच्या माध्यमातून झालेल्या भरती प्रक्रियेतील इतर बाबींचाही तपास केला जात आहे.