शेतकरी वर्गासह ग्रामस्थांना मिळाला आधार
रिसोड : तालुक्यातील आसोला येथील दोन विद्युत रोहित्र मागील चार महिन्यांपासून जळाल्याने ग्रामस्थांसह शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त झाला होता. यावेळी भानुदास पाचरणे यांच्यासह काही ग्रामस्थांनी आमदार भावनाताई गवळी यांच्याकडे व्यथा मांडली. त्यानंतर आमदार गवळी यांनी वीज वितरणच्या अभियंत्याशी संपर्क साधताच आसोला गावाला दोन विद्युत रोहित्र उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
खरीपातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि हळद पिकांना यंदाच्या पावसाचा कमालीचा फटका बसला. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी आणि बोअरवेलला पाणी होते, त्यांनाही पिकांना पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नव्हती. कारण मागील चार महिन्यांपासून गावासह शेतशिवारातील विद्युत रोहित्र जळालेले होते.
ग्रामस्थांनी अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींकडे विद्युत रोहित्रासाठी पाठपुरावा केला. मात्र, कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर लोढाई माता संस्थानचे अध्यक्ष भानुदास पाचरणे यांनी माजी सभापती गजानन पाचरणे यांच्या माध्यमातून विधानपरिषद आमदार भावनाताई गवळी यांच्याशी संपर्क साधून ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या.
यानंतर आमदार भावनाताई गवळी यांनी तात्काळ वीज वितरणच्या अभियंत्याशी संपर्क साधून आसोला गावाला दोन विद्युत रोहित्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आसोला गावाला दोन विद्युत रोहित्र उपलब्ध करून देण्यात आले.
यामुळे अभिमान पाचरणे, केशव पाचरणे, माधव देशमुख, गजानन पाचरणे, गणेश काकडे, शिवाजी सुसर, शिवाजी गाडेकर, विलास काकडे, शिवाजी पारणे यांच्यासह शेतकरी वर्ग कमालीचा सुखावला आहे. आमदार भावनाताई गवळी यांनी आसोला ग्रामस्थांसह शेतकऱ्यांसाठी केलेले प्रयत्न सफल ठरल्याने ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.