शिक्षक दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी सांभाळली विविध पदांची जबाबदारी; नेतृत्व, निर्णयक्षमता आणि प्रशासकीय कौशल्यांचा घेतला अनुभव
मानोरा : भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्थानिक मा. सु. पा. महाविद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, जबाबदारीची जाणीव, प्रशासकीय कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित व्हावा, या उद्देशाने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्वयंशासन दिनात कला विभागातील २१, विज्ञान विभागातील १५ आणि वाणिज्य विभागातील २, अशा एकूण ३८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक तसेच प्रशासकीय पदांची जबाबदारी स्वीकारत प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेतला. नियोजन, निर्णय घेणे, नेतृत्व करणे आणि जबाबदारी पार पाडणे याचा प्रत्यक्ष परिचय या उपक्रमातून विद्यार्थ्यांना झाला.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. इंगोले, कला विभागप्रमुख डॉ. जयंत कांबळे आणि वाणिज्य विभागप्रमुख प्रा. बी. ए. एस. थेर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एस. डी. इंगोले यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान मिळवण्यापुरते मर्यादित नसून त्यातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, निर्णयक्षमता, नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची भावना विकसित होते, असे त्यांनी सांगितले. स्वयंशासन दिनासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमात सानिका ठाकरे हिने प्राचार्याची भूमिका पार पाडत महाविद्यालयीन प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली. इतर विद्यार्थ्यांनीही विविध पदांची जबाबदारी स्वीकारून शिक्षक तसेच प्रशासकीय कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासासोबतच नेतृत्वक्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित होण्यास मदत झाली.
स्वयंशासन दिनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कला विभागातून फुल विजय राठोड याने अर्थशास्त्र विषयावरील व्याख्यानासाठी प्रथम क्रमांक पटकावला. गायत्री जानराव कांबळे हिने मराठी विषयात द्वितीय, तर देवयानी दीपक बाजारे हिने इंग्रजी विषयात तृतीय क्रमांक मिळविला.
विज्ञान विभागात आदित्य दीपक भुजाडे याने भौतिकशास्त्र विषयात प्रथम क्रमांक मिळविला. अनुजा सिद्धार्थ भगत हिने भौतिकशास्त्र विषयात द्वितीय, तर तंजीला इमरान भुरा हिने वनस्पतीशास्त्र विषयात तृतीय क्रमांक पटकावला. कोमल शंकर गावंडे हिला वनस्पतीशास्त्र विषयासाठी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. वाणिज्य विभागातून आचल अंबादास खंडारे हिने प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या, त्यांनी केलेले कार्य, शिस्तबद्ध वर्तन आणि कार्यतत्परतेबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.
स्वयंशासन दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळाला नाही, तर नेतृत्वाची भावना, लोकशाही मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीवही विकसित होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.