जिल्ह्यात डीएपी खतांचा तुटवडा; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कृषी विभागाला घेराव

खरीप हंगामाच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यात डीएपीसह इतर रासायनिक खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात डीएपी खतांचा तुटवडा; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कृषी विभागाला घेराव

DAP Fertilizer Shortage

‘बफर स्टॉक’ तातडीने खुला करण्याची मागणी; दोन दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

चिखली (DAP Fertilizer Shortage) : खरीप हंगामाच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यात डीएपीसह इतर रासायनिक खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कृषी सेवा केंद्रांवर खतांचा साठा संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. काही ठिकाणी खतांच्या टंचाईचा गैरफायदा घेत चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेत धडक देत कृषी विकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी विनायक सरनाईक, डॉ. ज्ञानेश्वर टाले, अमोल मोरे, राम अंभोरे यांच्यासह चिखली व मेहकर तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना आवश्यक असलेले डीएपी खत उपलब्ध होत नसल्याने पेरणीच्या तयारीवर परिणाम होत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. खतांचा पुरवठा कधी होणार याबाबत प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप करत संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली.

काळाबाजार रोखण्याची मागणी

यावेळी विनायक सरनाईक व डॉ. टाले यांनी काही विक्रेत्यांकडून डीएपी खताची अवाजवी दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. खतांच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत अशा प्रकारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून जिल्ह्यासाठी राखीव ठेवलेला डीएपी खताचा ‘बफर स्टॉक’ तातडीने खुला करण्याची मागणी केली.

प्रशासनाकडे विविध मागण्या

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सादर केलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :

  • डीएपी खताचा बफर स्टॉक तातडीने खुला करावा.
  • चिखली तालुक्याचा खताचा कोटा वाढवावा.
  • शासनमान्य दरात पारदर्शक पद्धतीने खत वितरण करावे.
  • खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी.
  • प्रत्येक तालुक्याला मिळालेल्या खतसाठ्याची माहिती सार्वजनिक करावी.
  • पुढील १५ दिवसांसाठी नियमित पुरवठ्याचे नियोजन जाहीर करावे.

दोन दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन

यावेळी रविकांत तुपकर यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा. डीएपी खताचा बफर स्टॉक खुला करून आवश्यक खतांचा पुरवठा तातडीने करण्यात यावा. अन्यथा चिखली आणि बुलढाणा येथील कृषी विभागाच्या कार्यालयांवर शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

“शेतकऱ्यांची आर्थिक लूट आणि खतांचा कृत्रिम तुटवडा अजिबात सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,” असा इशाराही त्यांनी दिला.

चिखली तालुक्यासाठी स्वतंत्र कोट्याची मागणी

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी चिखली तालुक्यातील लागवडीचे क्षेत्र लक्षात घेऊन डीएपी खताचा अतिरिक्त कोटा देण्याची मागणी केली. तसेच बफर स्टॉकमधून इतर तालुक्यांच्या तुलनेत चिखली तालुक्याला अधिक प्रमाणात खत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत कृषी विभागाने सकारात्मक भूमिका घेत आवश्यक प्रमाणात खत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफीची रक्कम मिळूनही IOB एकलारा शाखेतील २८८ शेतकऱ्यांची खाती बंद नाहीत. नवीन पीक कर्जासाठी चार तास ठिय्या आंदोलनानंतर तातडीच्या कार्यवाहीचे आदेश.

Sep 26, 2026
धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

कोरचीतील धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली.

Sep 26, 2026
शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

तावशीतील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तासन्‌तास उन्हात थांबले; भेट न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत करपलेल्या पिकांची होळी केली.

Sep 24, 2026
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषद; धान खरेदी, नुकसानभरपाई, महामार्ग व रोजगाराच्या मागण्या.

Sep 18, 2026