एमआयडीसीत सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी आ. पवारांचा दावा
औसा : मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतील उद्योजक औसा येथे उद्योग सुरू करण्यास इच्छुक आहेत, असा दावा करीत औसा एमआयडीसीत आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास मोठे उद्योग येथे येऊ शकतात व त्यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला.
औसा एमआयडीसी क्षेत्रातील १.४ कि.मी. लांबीच्या मुख्य सिमेंट रस्त्याचे ७.६३ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन आ. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने मजबूत आणि टिकाऊ रस्त्यांची आवश्यकता आहे. याचा विचार करून सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावर भर देण्यात येत असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी सांगितले. यापुढील काळात संपूर्ण औसा एमआयडीसी परिसरातील सिमेंट रस्ते तसेच नाल्यांची कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच औसा एमआयडीसी, औसा बाजार समिती आणि औसा शहरांतर्गत विविध सिमेंट रस्त्यांची विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. याचबरोबर बेलकुंड एमआयडीसीतील विकासकामांनाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. येत्या १० ते १५ वर्षांत लातूर जिल्ह्यातील औसा एमआयडीसीला अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रगत औद्योगिक क्षेत्र बनविण्याचा संकल्प असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
या भूमिपूजन कार्यक्रमास एमआयडीसी लातूरचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, एमआयडीसी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सूर्यवंशी, विश्वराज औटी, औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता बाळू राऊतराव, उपअभियंता पी. के. सरक, सभापती सौ. गंगाबाई कोदळीकर, उपसभापती अमोल पाटील, सुभाष जाधव, शिवलिंग औटी, कटाप्पा मुळे यांच्यासह एमआयडीसीचे पदाधिकारी, उद्योजक आणि नागरिक उपस्थित होते.