बबलाद गावातील 25 वर्षे जुन्या शाळेतील दुर्घटनेने खळबळ; चार विद्यार्थ्यांच्या डोक्याला दुखापत, प्राथमिक उपचारानंतर सर्वांना घरी सोडले
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावात जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. शाळेच्या पोर्चमधील काँक्रीटच्या छताचा काही भाग विद्यार्थ्यांच्या अंगावर पडला. या घटनेत 13 विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शाळेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला.
बबलाद येथील ही जिल्हा परिषद शाळा कन्नड माध्यमाची असून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येथे भरतात. शाळेत 250 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेची इमारत सुमारे 25 वर्षे जुनी आहे. मंगळवारी विद्यार्थी वर्गाकडे जात असताना पोर्चमधील जुन्या स्लॅबचा मोठा थर अचानक खाली आला. त्याखाली काही विद्यार्थी आणि शिक्षक सापडल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
छताचा भाग कोसळताच विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. काही विद्यार्थी मदतीसाठी आरडाओरड करू लागले, तर काही जण भीतीने रडू लागले. घटनेची माहिती मिळताच शिक्षक आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थी व शिक्षकांना ढिगाऱ्यातून दूर केले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
या दुर्घटनेत शिक्षक रमेश शिवमूर्ती आणि भीमण्णा गवळी यांच्यासह 13 विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी चार विद्यार्थ्यांच्या डोक्याला दुखापत झाली. सर्व जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. औषधोपचार आणि मलमपट्टी केल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे अधिकारीही रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, जुन्या इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शाळेची इमारत नव्याने उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जुन्या आणि धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना पाठवायचे कसे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पंचायत समिती सभापती सागर कल्याणशेट्टी यांनीही शाळेची इमारत नव्याने बांधण्याची मागणी केली असून प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.