अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना लक्ष्य करण्यासाठी पैशाचे आमिष दिल्याचा आरोप; सदर बाजार पोलिसांकडून तपास सुरू
सोलापुरात भाजपच्या विद्यमान आमदाराला गोळ्या घालण्यासाठी त्यांच्याच वाहन चालकाला पैशाचे आमिष दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना ठार करण्यासाठी त्यांच्या चालकाला ऑफर देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना सोलापुरातील महावीर चौक परिसरात घडल्याचे समोर आले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय सोलापुरात खरेदीसाठी आले असताना त्यांचा वाहन चालक आनंद सुरवसे हे गाडीजवळ थांबले होते. त्यावेळी श्रीशैल हुळळी आणि फुलारी हे दोघे त्यांच्याजवळ गेले.
आरोपींनी वाहन चालक आनंद सुरवसे यांना पैशांचे आमिष दाखवत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर गोळीबार करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर या कृत्याची जबाबदारी आपण घेऊ आणि त्यातून चालकाचा फायदा होईल, अशा स्वरूपाचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मात्र, आनंद सुरवसे यांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. तसेच या प्रकाराबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही संशयित तेथून निघून गेल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर वाहन चालक आनंद सुरवसे यांनी सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून श्रीशैल हुळळी आणि फुलारी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार आहेत. आमदाराला लक्ष्य करण्यासाठी चालकाला अशा प्रकारचे आमिष नेमके कोणत्या उद्देशाने देण्यात आले आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सोलापूर पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.