संघटनेच्या आग्रहाला मान; निवडणूक लढविण्याचा निर्धार
- उच्चशिक्षित नेतृत्वामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष
- शिक्षकांच्या प्रश्नांना मिळणार नवा आवाज
अकोला : आगामी काही महिन्यांत होऊ घातलेल्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झालेली असतानाच उच्चशिक्षित सौ. अदिती ऋषिकेश पोहरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. एका शिक्षक संघटनेसह समर्थक शिक्षकांच्या आग्रहाला मान देत त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने अमरावती विभागातील राजकीय वातावरणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सक्षम आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज असल्याचे समर्थक शिक्षकांचे म्हणणे आहे. वेतन, सेवाशर्ती, पदोन्नती, अनुदान, शैक्षणिक धोरणे आणि विविध प्रशासकीय अडचणी यांसारखे प्रश्न सातत्याने शासनाच्या पातळीवर मांडण्याची गरज आहे. याच अपेक्षेतून अदिती पोहरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे, यासाठी शिक्षकांकडून आग्रह करण्यात आला.
शिक्षकांच्या आग्रहातूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न अग्रक्रमाने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नवी चर्चा आणि नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राजकीय बाळकडू अन् शिक्षण क्षेत्राचा वारसा
सौ. अदिती ऋषिकेश पोहरे या माजी कृषी मंत्री हर्षवर्धन उर्फ भैय्यासाहेब देशमुख यांच्या कन्या आहेत. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचा वारसा त्यांना लाभला आहे. लहानपणापासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वातावरणाचा अनुभव मिळाल्याने विविध प्रश्नांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी त्यांना मिळाली. याच पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारसंघातील त्यांची संभाव्य उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे.
उच्चशिक्षित जमेची बाजू
अदिती ऋषिकेश पोहरे यांची शैक्षणिक पार्श्वभूमीही लक्षवेधी आहे. त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून एम.ई. स्ट्रक्चरल डिझाईन हे पदव्युत्तर शिक्षण विशेष प्रावीण्यासह पूर्ण केले आहे. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. मानसशास्त्र हे शिक्षणही विशेष प्रावीण्यासह पूर्ण केले आहे.
त्यापूर्वी त्यांनी विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय, बडनेरा येथून बी.ई. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली आहे. फोर्ट कॉन्व्हेंट, मुंबई आणि होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल, अमरावती येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले आहे.
अध्यापन अन् संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव
शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रत्यक्ष अनुभव हीदेखील महत्त्वाची बाब मानली जात आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, अकोला येथे त्या २०१० पासून पदव्युत्तर स्तरावर भूकंप अभियांत्रिकी विषयाच्या विशेष प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एम.ई. स्तरावरील विविध शोधप्रबंध तसेच संशोधन प्रकल्पांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
याशिवाय देशोन्नतीमध्ये संचालक व ‘महिलांचे व्यासपीठ मनस्वीनी’च्या संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत असून, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात अनेक इच्छुकांकडून निवडणुकीची तयारी सुरू असतानाच अदिती पोहरे यांच्या उमेदवारीची चर्चा पुढे आल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. उच्चशिक्षित पार्श्वभूमी, अध्यापनाचा अनुभव, शिक्षण क्षेत्राशी असलेला संबंध आणि राजकीय वारसा या चारही बाबी त्यांच्या उमेदवारीला वेगळी धार देऊ शकतात.