खर्च कपातीच्या नावाखाली चांगल्या उपक्रमाला फाटा
हिंगोली (Hingoli Ganeshotsav) : जिल्ह्यात दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सार्वजनिक गणेश मंडळांना आदर्श आचारसंहिता नियमावलीचे पुस्तक व जनजागृतीसाठी भिंती पत्रकांचे वाटप केले जात होते. मात्र यंदाच्या वर्षी पोलीस प्रशासनाने या उपक्रमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे. खर्च कपातीच्या नावाखाली हा महत्त्वाचा उपक्रम बंद करण्यात आला की प्रशासनाला याचा विसर पडला, असा सवाल गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांमधून उपस्थित केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांची परंपरा पाहता गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, ध्वनी प्रदूषण टाळावे, मंडप उभारणी, विद्युत व्यवस्था, वर्गणी वसुली आणि विसर्जन मिरवणुकी संदर्भात कोणते नियम पाळावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन असलेली आदर्श आचारसंहिता नियमावली पुस्तिका जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत प्रकाशित केली जात होती. जिल्ह्यातील प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाला ही पुस्तिका वाटप केली जात असे. त्यासोबतच सर्वसामान्य भाविकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रत्येक मंडळाच्या दर्शनी भागात लावण्यासाठी भिंती पत्रकेही दिली जात होती. या पत्रकांमुळे मंडळाच्या पदाधिकार्यांना आणि कार्यकर्त्यांना नियमांची जाणीव राहत असे.
यंदा मात्र (Hingoli Ganeshotsav) गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही अद्याप एकाही मंडळाला अशी पुस्तके किंवा भिंती पत्रके मिळालेली नाहीत. पोलीस प्रशासनाकडून याबाबत कोणतीही सूचना किंवा बैठकही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. नवीन मंडळांची संख्या वाढली असून अनेक नवीन कार्यकर्त्यांना नियमांची पूर्ण माहिती नाही. अशा परिस्थितीत ही मार्गदर्शक पुस्तिका अत्यंत उपयुक्त ठरत होती.
खर्चाला कात्री लावण्याच्या नावाखाली पोलीस प्रशासनाने हा उपक्रम गुंडाळला असल्याची चर्चा आहे. परंतु कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या बाबीकडे दुर्लक्ष करणे योग्य नसल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. पुस्तक छपाईचा खर्च हा किरकोळ असून त्यामुळे मोठी जनजागृती होत होती.या चांगल्या उपक्रमाकडे पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गणेश मंडळातून नाराजीचा सुर उमटू लागला आहे.