7700 नंतर 7500 हायजॅक अलर्ट; भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडल्याने प्रवासी आणि क्रूला हस्तक्षेप करता आला
दुबईहून तेल अवीवकडे रवाना झालेल्या फ्लाय दुबईच्या FZ1073 विमानात 30 सप्टेंबर रोजी हवेतच गंभीर घटना घडली. विमान सौदी अरेबियाच्या हवाई क्षेत्राजवळ असताना आधी ‘7700’ हा सामान्य आपत्कालीन संदेश आणि त्यानंतर ‘7500’ हा अनधिकृत हस्तक्षेप किंवा संभाव्य हायजॅकचा संकेत देणारा कोड प्रसारित झाला. त्यामुळे इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आणि लढाऊ विमानेही विमानाच्या दिशेने रवाना करण्यात आली.
विमानात एकूण 174 प्रवासी होते. उड्डाणादरम्यान कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये हिंसक झटापट झाल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेत भारतीय कॅप्टन स्मित मच्छार गंभीर जखमी झाले. उपलब्ध माहितीनुसार, सहवैमानिकाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा नेमका हेतू अद्याप तपासाधीन आहे.
A terrifying incident unfolded aboard Flydubai FZ1073 from Dubai to Tel Aviv. Reports say Indian Captain Smit Machchhar was stabbed during a cockpit struggle with his Omani co-pilot as the aircraft made a rapid descent. Passengers and crew intervened, helping prevent a potential…
— Maratha Newz (@Maratha_NEWz) September 30, 2026
या संघर्षादरम्यान विमानाची उंची झपाट्याने कमी झाली. परिस्थिती गंभीर होताच विमानाकडून प्रथम 7700 आणि त्यानंतर 7500 हा आपत्कालीन कोड पाठवण्यात आला. 7500 हा संभाव्य हायजॅक किंवा unlawful interference दर्शवणारा संकेत असल्याने इस्रायली सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. इस्रायली हवाई दलाची लढाऊ विमानेही विमानाच्या दिशेने रवाना झाली होती.
गंभीर जखमी अवस्थेतही कॅप्टन स्मित मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे विमानातील प्रवासी आणि क्रू सदस्यांना आत प्रवेश करता आला आणि हल्लेखोर सहवैमानिकाला रोखण्यात मदत झाली. विमानात उपस्थित असलेल्या इतर वैमानिकांनी आणि काही प्रवाशांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप केला. त्यानंतर विमानाचा मार्ग सौदी अरेबियातील तबूककडे वळवण्यात आला आणि विमानाने तेथे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले.
Indian pilot Smit Machchhar reportedly fought off an Omani co pilot who stabbed him and tried to crash a Flydubai flight. Despite being injured, Smit regained control and helped save more than 170 people onboard.
— Abhi 🇮🇳 (@Patelizm) September 30, 2026
https://t.co/nrloPu4QEz pic.twitter.com/dQH7wDqz94
विमानातील या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीच्या बैठका घेतल्या. सुरुवातीला संभाव्य हायजॅक किंवा दहशतवादी हल्ल्याची शक्यता तपासली जात होती. मात्र फ्लाय दुबईने या घटनेची कारणे आणि हेतू अद्याप अधिकृत तपासाचा विषय असल्याचे सांगत निष्कर्ष काढण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसी कृतीचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. गंभीर परिस्थितीत जखमी असूनही त्यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी धैर्य दाखवल्याचे मोदी यांनी म्हटले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारतीय पायलटला ‘हिरो’ संबोधत त्यांच्या कृतीचे कौतुक केले.
स्मित मच्छार यांच्यावर सौदी अरेबियात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे भारतीय दूतावासाशी संबंधित माहितीतून समोर आले आहे. दुसरीकडे, या संपूर्ण घटनेमागील कारण, सहवैमानिकाचा नेमका हेतू आणि कॉकपिटमध्ये घडलेल्या घटनांचा क्रम याबाबत तपास सुरू आहे.