कळमनुरी तालुक्यातील आराटी येथे पीक परिस्थितीची पाहणी; तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश
महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शेतकर्यांना ग्वाही
आखाडा बाळापूर / कळमनुरी (Chandrashekhar Bawankule) : दुष्काळसदृश्य परिस्थितीत शासन संवेदनशीलतेने काम करीत असून, शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध सवलती व उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत या पाचही तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. या तालुक्यांतील पीक परिस्थितीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती प्रशासनाने संकलित करावी, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. शेतकर्यांनी धीर सोडू नये, शासन त्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी कळमनुरी तालुक्यातील आराटी येथे दुष्काळसदृश्य पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतातील पिकांची पाहणी करून शेतकर्यांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. पिकांचे नुकसान, पावसातील खंड आणि सद्यःस्थितीबाबत शेतकर्यां कडून माहिती जाणून घेतली. संकटाच्या काळात शासनाकडून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकर्यांना दिले. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, खासदार रामराव वडकुते, आमदार संतोष बांगर, आमदार डॉ. प्रज्ञा सातव, आमदार किसनराव वानखेडे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जे. के. कांबळे, तालुका कृषी अधिकारी के. एस. जाधव यांच्यासह यवतमाळ -पुसदचे भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, भाजयुमो जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम, राजेंद्र शिर्के, लखन कुरील, नगरसेवक सुभाष बांगर, दत्ता बोंढारे, भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सुजितसिंह ठाकुर, शिवाजी घुगे, सचिन पवार, उमेश नागरे, अजय कदम, मयुर शिंदे यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व तालुक्यांतील पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. पंचनाम्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ चित्र स्पष्ट होण्यास मदत होईल. दुष्काळाच्या परिस्थितीत चारा, पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी तसेच शेतकर्यांना आवश्यक आर्थिक मदत याबाबत तत्परतेने काम करण्यात येईल असेही सांगितले. हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यापैकी सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ३३ हजार हेक्टरवर तूर, तर ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली आहे. पावसाचा लांबलेला खंड आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे विशेषतः सोयाबीन पिकाला मोठा फटका बसल्याचे यावेळी सांगितले.
राज्य शासन संवेदनशीलतेने काम करीत असून, राज्यातील मंत्री, खासदार आणि आमदार शेतकर्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करीत आहेत. संकटाच्या काळात शेतकर्यांना वार्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे, पिण्याच्या पाण्याचे तसेच पशुधनासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे, यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व नागरिकांना आवश्यक तो दिलासा मिळेल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.