गुढीः ज्ञान - भक्ती-वैराग्य आणि विवेकाचे प्रतीक

आपल्या संस्कृतीत प्रतिवर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदा हा दिवस नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो.

गुढीः ज्ञान - भक्ती-वैराग्य आणि विवेकाचे प्रतीक

(Hindu Culture) आपल्या संस्कृतीत प्रतिवर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदा हा दिवस नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याला महाराष्ट्रात 'पाडवा' हा शब्द रूढ आहे. याच पाडव्याची गणना साडेतीन शुभमुहूर्तामध्ये होते. दिवाळीनंतरच्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येणाऱ्या आणखीन एका म्हणजे, विक्रम शकाच्या वर्षारंभाच्या दिवसापेक्षा; म्हणजेच पाडव्यापेक्षा त्याचे वेगळेपण सांगण्यासाठी त्याला 'गुढीपाडवा' असे म्हटले जाते. या दिवशी घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करून चैतन्याने, नव्या संकल्पनेने जीवन जगण्यास आपण तयार होतो. खरंतर गुढीपाडवा नैसर्गिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि विजयोत्सव हर्षाचे प्रतीक आहे. हजारो वर्षांपूर्वी शालिवाहनाने शकांचा पराभव केला. तो दिवस गुढीपाडवा. एकंदरीत गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे.

रामायणाच्या संदर्भानुसार, प्रभू श्रीरामचंद्र, सीता व लक्ष्मणासह आपल्या वडिलांच्या आज्ञापालनार्थ चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्या नगरीत परतले. तो दिवस गुढीपाडव्याचा होता. प्रसंगी अयोध्यावासीयांचा आनंद अद्भूत अवर्णनीय होता. तेव्हा लोकांनी घरोघरी गुढी, तोरणे उभारून आनंदोत्सव साजरा केला.

गुढी उभारण्याची सांस्कृतिक परंपरा आजही कायम आहे व साता समुद्रापार पोहचलेली आहे. तसेच संत वाङमयाच्या माध्यमातून वैचारिक धन बनलेली आहे. अनेक संदर्भाने बहुविध दृष्टिकोनातून गुढी ही सोपस्कार नाही, तर ती मानवी जीवनात, चराचरात सकारात्मकता व ऊर्जा संचारित करणारी आहे. गुढीच्या संदर्भात अनेक दंतकथा आहेत, त्यात दुष्टांचा पराभव करून सुनीतीचे राज्य प्रस्थापित केले. अधर्मावर धर्माने विजय प्राप्त करणे दर्शविते. निराशेवर आशेची फुंकर घालते. मरगळ झटकून ऊर्जेचे दान मुक्तहस्ते प्रदान करते. निसर्गही आपला धर्म अचूकपणे सांभाळतो. आधुनिक काळातसुद्धा आपण कुठलेही शुभकार्य, शुभसंकल्पना आणि कार्यारंभाची रुजवात करतो.

एकंदरीत गुढी सकारात्मक सद्विचारांची पेरणी व जीवनात सकारात्मक दृष्टीकोण प्रदान करणारी आहे. समता, समरसता, विश्वबंधुत्वाची भावना, विषय-विकारांची जळमटे स्वच्छ करून भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि विवेकाचा एक आदर्श संकल्प आहे. सामाजिक न्यायाचा विचार प्रस्थापित करणारे आणि आपल्या जागतिक वारसा स्थळांमध्ये ज्या पंढरपूरच्या वारीचा समावेश आहे, अशा पंढरीच्या वारीवर बोलताना संत चोखामेळा म्हणतात.

'टाळी वाजवावी गुढी उभारावी।
वाट ही चालावी पंढरीची ।।'

तर समर्थ रामदास स्वामींनी गुढीला व्यावहारिक अर्थाने न बघता पुढीलप्रमाणे रचना केली आहे.

'कांही बोल रे विठ्ठला ।
मौन वेष का धरीला ।।
काय मागतो गाठोडी।
बोलसी ना धरिली गुढी ।।
आशा वैभवाची नाही ।
भिऊ नको वद काही ।।
न लगे धनदारा ।।
वेगे लोचन उघडा ।।
दास मने वाट पाहे।
कृपा
करूनि भेटावे ।।

प्रस्तुत रचनेतून समर्थांचे वैराग्य व भगवंताच्या भेटीची तळमळ व्यक्त होते. वैराग्याच्या सामर्थ्यावर विठ्ठलाला मागणी करताना म्हणतात.. मी भक्तीची गुढी हाती धरलेली आहे. मला धनसंपत्तीची नव्हे, तर मला फक्त तुझ्या भेटीची आर्तता आहे.

संत नामदेवरायसुद्धा भक्तीत रममाण होऊन एका रचनेत म्हणतात.

'फोडा फोडा रे भंडारे।
आणा गायीची खिल्लारे ।।
उभवा उभवारे गुढी।
सोडा वस्त्राची गाठोडी।।'

अशाप्रकारे गुढीचा आशय संतांच्या साहित्यातून भिन्नभिन्न प्रकारे दृष्टीस पडतो. त्यांची गुढी ही विवेकाची, सायुज्यतेची, भक्तिमार्ग प्रदीप्त करून ज्ञानसूर्याकडे घेऊन जाते.

संत एकनाथांच्या आत्मस्थितीपर अभंगात गुढीचा संदर्भ पुढीलप्रमाणे आहे. 'भक्त देव एके ठायी ते आवडी । घेऊनिया गुढी जाऊ तेथे।।' असे म्हटलेले दिसते, तर नाथांच्या गद्यरचनेतून चर्तुश्लोकी एकनाथी भागवतात पुढीलप्रमाणे गुढीचा आशय आहे.

चाखता निज सुख गोडी ।
हरपती दुःख कोडी ।
उभुनि भक्तीसाम्राज्य गुढी
स्वानंद
जोडी जोडावी।'

अशा आणि यासारख्या अनेक गुढींचा आशय असणाऱ्या ओव्या एकनाथी भागवतात आहे. संत ज्ञानेश्वरांनीसुद्धा ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चौथ्या, सहाव्या आणि अकराव्या अध्यायामध्ये गुढीचा संदर्भ व्यक्त केला आहे. याशिवाय माऊलींची पुढील रचना जनमानसात प्रिय आहे.

'माझ्या जिवीची आवडी ।
पंढरपुरा देईन गुढी।।'

शशिकांत म. तोटेदारव्हा,
जि. यवतमाळ
 मो.नं.: ९१३०८३५४५८

संबंधित सामग्री

पोहरादेवी येथील नगारा म्युझियमच्या १ किमी परिसरात आंदोलन, उपोषणास बंदीची मागणी!  

पोहरादेवी येथील नगारा म्युझियमच्या १ किमी परिसरात आंदोलन, उपोषणास बंदीची मागणी!  

Pohradevi Nagara Museum: मानोरा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील म्युझियम व परिसरातील १ किलोमीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे आंदोलन, उपोषण, अवैध जमाव करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी

Aug 20, 2026
बंजारा विरासत संघाचा संवाद मेळावा उत्साहात

बंजारा विरासत संघाचा संवाद मेळावा उत्साहात

Banjara Heritage Sangh: बंजारा समाजाची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक प्रगती अधिक गतिमान करण्यासाठी बंजारा विरासत संघाच्यावतीने नुकतेच युवकांनी संवाद मेळाव्याचे आयोजन

Aug 18, 2026
नंगारा विरासत म्युझियमची तिकीट १०० रुपये करा; उद्या ताला ठोको आंदोलन

नंगारा विरासत म्युझियमची तिकीट १०० रुपये करा; उद्या ताला ठोको आंदोलन

Nangara Virasat Museum: नंगारा विरासत म्युझियमला दर्शकांना २०० रुपयेची टिकिटदर असल्यास गरिब भक्तांना पाहणे थोरले बाधा होईल, असे वाटून धार्मिक नेत्यांची तिकिट दर १०० रुपये करावी

Aug 03, 2026
मंचरमध्ये मुसळधार पावसाचा फटका; ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा काही भाग कोसळला

मंचरमध्ये मुसळधार पावसाचा फटका; ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा काही भाग कोसळला

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे.

Aug 02, 2026
अनोखा धार्मिक वारसा! मुस्लिम देशात बांधले 156 फूट उंच शिवमंदिर

अनोखा धार्मिक वारसा! मुस्लिम देशात बांधले 156 फूट उंच शिवमंदिर

Indonesia Prambanan Temple: प्रंबनन मंदिर प्राचीन हिंदू संस्कृती आणि वास्तुकलेचे एक महत्त्व, ऐतिहासिक महत्त्व असून, पर्यटन आणि संस्कृतीसाठी लोकप्रिय ठरला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे भेट

Jul 07, 2026