चौकशीची मागणी होत असतानाच सुनावला 23वा मृत्युदंड
आग्रा (Agra Court Death Sentence) : मुझफ्फरनगरमधील ‘फास्ट ट्रॅक कोर्ट-3’चे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रवी कुमार दिवाकर (Judge Ravi Kumar Diwakar) यांनी अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्याने ते यापूर्वी चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांच्या न्यायालयातील हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यांशी संबंधित एकूण 97 प्रलंबित प्रकरणे परत घेण्यात आली होती. त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी होत असतानाच त्यांनी आणखी एका प्रकरणात 23वा मृत्युदंड सुनावला आहे. त्यामुळे न्यायाधीश दिवाकर पुन्हा चर्चेत आले आहेत.
मुझफ्फरनगर न्यायालयात सोमवारी नदीम (वय 38) याला (Agra Court Death Sentence) पत्नीच्या हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. नदीम हा शाहपूर येथील रहिवासी आहे. 23 जुलै 2018 रोजी संध्याकाळी तो मद्यधुंद अवस्थेत घरी आला होता. त्यावेळी त्याचा पत्नी शहजादीसोबत वाद झाला. नदीमने तिला घटस्फोट देण्याची धमकी देत तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.
गंभीर अवस्थेत शहजादीला मुझफ्फरनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला नवी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पाच दिवसांनी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहजादीचे वडील दिलशाद यांच्या तक्रारीवरून २३ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआरमध्ये नदीमसह त्याची आई आणि बहीण यांनाही आरोपी करण्यात आले होते.
प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रवी कुमार दिवाकर (Judge Ravi Kumar Diwakar) यांनी नदीमला फाशीची शिक्षा सुनावली. त्याच्यावर दीड लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. हत्या करण्याची पद्धत अत्यंत क्रूर आणि अमानुष असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हे प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (Rarest of Rare) श्रेणीत येत असल्याचे नमूद केले.
न्यायाधीशांचे परखड निरीक्षण
निकाल सुनावताना न्यायाधीश दिवाकर (Judge Ravi Kumar Diwakar) यांनी आपल्या निर्णयात न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “माझ्या आई-वडिलांनी मला फक्त देवाला घाबरायला शिकवले आहे, इतर कुणालाही नाही. बाहुबली, माफिया किंवा गुन्हेगारांच्या भीतीने मी न्यायाचे काम केले, तर जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडून जाईल,” असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. नदीमला सुनावण्यात आलेली शिक्षा ही (Agra Court Death Sentence) न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांच्या कारकिर्दीतील २३वी फाशीची शिक्षा ठरली आहे. त्यामुळे त्यांच्या न्यायालयीन कामकाजाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.