रिफाइंड पाम तेल, पामोलिन आणि रसायनांपासून तूप तयार केल्याचा EDचा दावा; २०१९-२०२४ दरम्यान ९६ कोटी रुपयांच्या भेसळयुक्त तुपाचा आरोप
तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपातील कथित भेसळ प्रकरणाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणाच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तूप पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या मालकाला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. सुकृती फूड्सचे मालक कैलाश चंद मंगला यांच्यावर भेसळयुक्त तूप तयार करून त्याचा पुरवठा केल्याचा आरोप आहे.
EDच्या माहितीनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) तूप भेसळ प्रकरणात हैदराबाद येथील ED कार्यालयाने १७ सप्टेंबर रोजी कैलाश चंद मंगला यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना विशाखापट्टणम येथील मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
तुपाच्या नावाखाली तेल आणि रसायनांचा वापर?
तिरुपती लाडू प्रसादासाठी वापरले जाणारे कथित भेसळयुक्त तूप नेमके कशापासून तयार केले जात होते, याबाबत EDने तपासातील माहिती समोर ठेवली आहे. एजन्सीच्या दाव्यानुसार, रिफाइंड पाम तेल, पाम कर्नल तेल, पामोलिन तसेच एमजी-९०, मोनोग्लिसराइड्स, मायव्हेसिट सॉफ्ट ४०० आणि अॅसिटिक अॅसिड एस्टर यांसारख्या विविध रसायनांचा वापर करून हे पदार्थ तयार करण्यात आले.
EDच्या म्हणण्यानुसार, या मिश्रणाला ‘अॅगमार्क स्पेशल ग्रेड गाईचे तूप’ म्हणून TTDला पुरवण्यात आले. त्यामुळे तूप पुरवठ्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Vijayawada, Andhra Pradesh: APCC Vice President Gurunadham says, "The serious allegation is that during the tenure of the YCB government, adulterated laddu prasadam was distributed to the people. The ghee that was usually used by the Tirumala Tirupati Devasthanams for the laddus… pic.twitter.com/o0dYnlB11n
— IANS (@ians_india) September 19, 2026
२३० कोटींच्या तूप पुरवठ्यात ९६ कोटींचे कथित भेसळयुक्त तूप
EDने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ ते २०२४ या कालावधीत TTDला पुरवण्यात आलेल्या तुपाची एकूण किंमत २३० कोटी रुपये होती. यातील सुमारे ९६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप कैलाश चंद मंगला यांनी तयार केल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
या प्रकरणात मंगला हा सह-आरोपींपैकी एक असल्याचेही EDने म्हटले आहे. भेसळयुक्त तूप तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांची उपलब्धता करून देण्यात त्याने मदत केल्याचा तसेच त्याच्या कारखान्यात कथित भेसळयुक्त तूप तयार केल्याचा आरोप आहे.
तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, श्री वैष्णवी डेअरी स्पेशालिटीज, मालगंगा मिल्क अँड अॅग्रो प्रॉडक्ट्स आणि ए. आर. डेअरी फूड्स या विविध शेल कंपन्यांच्या माध्यमातून भेसळयुक्त तुपाच्या पुरवठ्याचे समन्वय साधण्यात मंगलाची भूमिका असल्याचा EDचा दावा आहे.
या अटकेनंतर तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणातील आर्थिक व्यवहार, पुरवठा व्यवस्था आणि त्यामागील कथित साखळीबाबत तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे तिरुपती मंदिरातील प्रसिद्ध लाडू प्रसादाच्या तूप पुरवठ्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.