सप्टेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ दरम्यान तीव्र उष्णतेचा परिणाम; महाराष्ट्रात १०० टक्के दुष्काळाच्या इशाऱ्याने चिंता वाढली
नवी दिल्ली : यंदाच्या ‘सुपर एल निनो’मुळे जगभरातील तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, त्याचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या Climate Impact Lab च्या नव्या अहवालानुसार, सप्टेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या सहा महिन्यांच्या कालावधीत सामान्य परिस्थितीच्या तुलनेत जगभरात सुमारे ४ लाख ५१ हजार अतिरिक्त उष्णताजन्य मृत्यू होण्याचा अंदाज आहे. भारतातही या कालावधीत सुमारे १५,८०० अतिरिक्त मृत्यू होण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
या आकडेवारीचा अर्थ आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या असा नसून, सामान्य वर्षाच्या तुलनेत अपेक्षित असलेल्या अतिरिक्त उष्णताजन्य मृत्यूंचा अंदाज असा आहे. अहवालातील अंदाज १९९६ ते २०२५ या कालावधीतील परिस्थितीच्या तुलनेवर आधारित आहे.
जागतिक तापमानात १.२ अंश सेल्सिअस वाढीचा अंदाज
Climate Impact Lab च्या अभ्यासानुसार, आगामी सहा महिन्यांत जागतिक भूभागाचे तापमान सरासरीपेक्षा सुमारे १.२ अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे. यासोबतच अत्यंत उष्ण दिवसांची संख्या सामान्य परिस्थितीच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संशोधकांच्या मते, या काळातील उष्ण परिस्थिती आजपासून सुमारे २० वर्षांनंतर हवामान बदलामुळे अपेक्षित असलेल्या तापमानासारखी असू शकते.
या हवामान बदलाचा परिणाम केवळ उष्णतेपुरता मर्यादित राहण्याची शक्यता नाही. पावसाच्या पद्धतीत बदल झाल्यास दुष्काळ, जंगलातील आगी आणि पूर यांसारख्या टोकाच्या हवामान घटनांचाही धोका वाढू शकतो. त्यामुळे या परिस्थितीचा परिणाम विविध भागांतील आरोग्य, शेती आणि जनजीवनावर होण्याची शक्यता आहे.
भारतामध्ये १५,८०० अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज
अहवालानुसार भारताला या हवामान बदलाचा मोठा फटका बसू शकतो. सप्टेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या सहा महिन्यांत भारतात सुमारे १५,८०० अतिरिक्त उष्णताजन्य मृत्यू होण्याचा अंदाज असून, या आकडेवारीत सुमारे १,६०० मृत्यूंची अनिश्चितता आहे. भारतातील या अंदाजित मृत्यूंपैकी जवळपास निम्मे मृत्यू डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर भारतातील उन्हाळ्यातही हा धोका कायम राहू शकतो.
जगातील सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये आफ्रिकेतील साहेल प्रदेश, इंडोनेशिया, भारत आणि ब्राझील यांचा समावेश आहे. साहेलमध्ये ६६,८००, इंडोनेशियात १९,३०० आणि ब्राझीलमध्ये १३,३०० अतिरिक्त उष्णताजन्य मृत्यूंचा अंदाज अहवालात देण्यात आला आहे. फिलिपिन्स, व्हिएतनाम, थायलंड आणि कंबोडिया या चार देशांमध्ये मिळून १९,४०० अतिरिक्त मृत्यू होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता
दरम्यान, महाराष्ट्रातील पावसाच्या तुटवड्यामुळे दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असल्याचे चित्र आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सप्टेंबरअखेर महाराष्ट्रात १०० टक्के दुष्काळाची स्थिती जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांनी सध्याची कोरडी परिस्थिती आपल्या आयुष्यातील अत्यंत गंभीर परिस्थितींपैकी एक असल्याचे सांगितले आहे. सोयाबीन, कापूस आणि ऊस या प्रमुख खरीप पिकांना मोठा फटका बसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
पावसाअभावी महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा, कर्नाटक आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये दुष्काळाचा प्रभाव दिसत असल्याचे संबंधित दुष्काळ नकाशांमध्ये नमूद करण्यात आले आहे. कमी पावसाच्या भागांमध्ये जमिनीतील ओलावा आणि पिकांची स्थितीही प्रभावित झाल्याचे अहवालांमध्ये नमूद आहे.
तातडीच्या उपाययोजनांची गरज
Climate Impact Lab च्या अहवालात सर्वाधिक धोका असलेल्या भागांची ओळख करून तेथे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. उष्णतेचे पूर्वसूचना संदेश, कूलिंग सेंटर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बाहेर काम करणाऱ्या कामगारांसाठी संरक्षणात्मक उपाय आणि आरोग्य यंत्रणेची अतिरिक्त तयारी यामुळे संभाव्य मृत्यूंची संख्या कमी करता येऊ शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
म्हणूनच सुपर एल निनोचा पुढील काही महिन्यांतील प्रभाव केवळ हवामानाच्या दृष्टीने नव्हे, तर सार्वजनिक आरोग्य, शेती आणि पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.