फेब्रुवारी 2027 पर्यंत पदावर राहणार; Tata Trustsसोबतच्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर निर्णय, टाटा कंपन्यांच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांपर्यंत घसरण
देशातील आघाडीच्या उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या Tata Sonsमध्ये नेतृत्वबदलाचे संकेत मिळाले आहेत. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (AGM) आधी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या AGMच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय समोर आल्याने कॉर्पोरेट जगतात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
63 वर्षीय एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या निर्णयाची माहिती टाटा सन्सच्या संचालक मंडळाला दिल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यांचा विद्यमान कार्यकाळ फेब्रुवारी 2027 मध्ये पूर्ण होणार असल्याने तोपर्यंत ते अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यामुळे राजीनामा जाहीर झाला असला तरी तत्काळ नेतृत्वबदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
AGMपूर्वी राजीनामा का?
चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत होता. 18 ऑगस्टच्या AGMमध्ये त्यांच्या संचालकपदाच्या पुनर्नियुक्तीबाबत निर्णय होणार होता. टाटा सन्समध्ये सुमारे 66 टक्के हिस्सा असलेल्या Tata Trustsच्या भूमिकेकडे या प्रक्रियेत विशेष लक्ष लागले होते.
चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीबाबत Tata Trustsचे अध्यक्ष नोएल टाटा यांच्याशी मतभेद असल्याचे वृत्त यापूर्वी समोर आले होते. फेब्रुवारीतील बैठकीत त्यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे टाटा सन्स आणि Tata Trusts यांच्यातील संबंध तसेच समूहाच्या नेतृत्वाबाबत चर्चांना उधाण आले होते.
Tata Sons Chairman, N Chandrasekaran, released a statement, "I have communicated to the Tata Sons Board that I have decided not to offer myself for reappointment when my term ends on Feb 20, 2027. I have asked the Board to decide on the succession soon to ensure a proper… pic.twitter.com/cG5eBoftOg
— ANI (@ANI) August 12, 2026
टाटा कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम
चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर टाटा समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये दबाव दिसून आला. विशेषतः Tata Consultancy Services (TCS)सह काही टाटा कंपन्यांच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली. या घडामोडीमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष आता समूहाच्या पुढील नेतृत्वाकडे लागले आहे.
2017 पासून टाटा समूहाची धुरा
एन. चंद्रशेखरन यांनी 2017 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर समूहाच्या विविध व्यवसायांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते Tata Consultancy Services, Tata Motors आणि Tata Consumer Products यांसारख्या प्रमुख टाटा कंपन्यांचे अध्यक्षही आहेत.
त्यांच्या नेतृत्वाचा जवळपास दशकभराचा कालावधी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. दरम्यान, 18 ऑगस्टच्या AGMमध्ये टाटा सन्सच्या नेतृत्वासंदर्भात पुढील चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.