पातूर (Channi police action) : तालुक्यातील तुलंगा बु. येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणातील आरोपीला चान्नी पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. पोलीस ठाणे चान्नी येथे गुन्हा क्रमांक १५३/२०२६ अंतर्गत भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध घेऊन अजय भारत डाखोरे (वय २०, रा. इंदिरा आवास, बार्शिटाकळी, जि. अकोला) याला अटक केली.
सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी सौ. बेबीबाई गणेश हातोले (वय ५४, रा. तुलंगा बु., ता. पातूर) या २२ मार्च ते २७ मार्च दरम्यान कुटुंबासह नागपूर येथे वैद्यकीय कारणास्तव गेल्या होत्या. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटातील लॉकर फोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
चोरीस (Channi police action) गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याचे डोरले, मणी, नथ, अंगठ्या, दानी, पोत तसेच चांदीचे जोडवे व तोरड्या यांचा समावेश असून एकूण सुमारे १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. तपासादरम्यान गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी बार्शिटाकळी येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
ही (Channi police action) कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र लांडे, पोलीस उपनिरीक्षक विजय घुगे, पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर करवते व राहुल महाजन यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय घुगे करीत आहेत.