विशेष पोलिस उपमहा निरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाची कामगिरी
हिंगोली (Hingoli Gambling Raid) : शहरातील एनटीसी भागामध्ये एका व्यापारी संकुलनाच्या गाळ्यात रविवारी रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने मारलेल्या छाप्यात १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चारचाकी वाहनासह ८ मोटार सायकल १५ मोबाईल व २ लाख १६ हजार रुपये असा एकुण १८ लाख ४७ हजार २० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान पोलीस तपासात आरोपी संख्या 23 वर पोहोचली आहे.
हिंगोली शहरातील एनटीसी भागातील दोस्ती मित्र मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट एनटीसी तापडीया इस्टेट भागातील व्यापारी संकुलनाच्या एका गाळ्यात झन्ना मन्ना जुगार सुरू असल्याची माहिती नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना मिळाल्याने त्यांनी नांदेड येथून पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉॅ प्रदिप खानसोळे, गजानन डवरे, गणेश राठोड या कर्मचार्यांना रवाना केले. ५ सप्टेंबर शनिवार रोजी पथकाने सायंकाळच्या सुमारास अचानक छापा मारला असता सदर गाळ्यात अनेकजण पत्यावर पैसे लावून झन्ना मन्ना जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पोलिसांनी नगदी रक्कम २ लाख १६ हजार २० रुपये. चारचाकी क्रेटा कार क्रमांक एमएच ३८ एके ११३० ही १० लाख रुपयाची, ४ लाख ४० हजार रुपयाच्या ८ मोटार सायकल १ लाख ९१ हजार रुपयाचे १५ मोबाईल असा एकुण १८ लाख ४७ हजार २० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या (Hingoli Gambling Raid) प्रकरणी ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २.४१ वाजता सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अब्दुल जावेद अब्दुल हमीद रा. खडकपुरा हिंगोली, निनाजी दशरथ कांडेलकर रा. रिसाला बाजार हिंगोली, विनोद दत्तराव पांढरे रा.कोेंडवाडा, फारूख बेग खालेद बेग रा. आजम कॉलनी हिंगोली, निलेश पंडीत, आकाश कैलास तारे रा. वंजारवाडा हिंगोली, मदनलाल गंगाप्रसाद जैस्वाल रा. तोफखाना हिंगोली, गजानन सोपान गिते रा. रुपूर ता. औंढा ना., मनोज विश्वनाथ गायकवाड रा. मस्तानशहा हिंगोली, सुनिल सुदाम लोखंडे रा. महादेववाडी मंगळवारा बाजार हिंगोली, संतोष बळीराम कांदे रा. खेड, नागोराव जनार्धन काळे रा. काकडदाभा ता. औंढा ना., शिवाजी राजाराम कठारे रा. जवळा बाजार, धनाजी रामकिशन दहातोंडे रा. गंगानगर हिंगोली, सतिष नामदेवराव फुसळे रा. हिंगोली, नसीरखान नवाजखान रा. खाजा कॉलनी हिंगोली, विठ्ठल परसराम काळे या १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे हे करीत आहेत.
विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉॅ प्रदिप खानसोळे, गजानन डवरे, गणेश राठोड व हिंगोली शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक गिरी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, शेख अमजद, आकाश बोथीकर, गोपिनाथ घुगे, दिलीप लेकुळे, बाबासाहेब कांबळे, शेख आवेज यांनी या कामगिरीत सहभाग नोंदविला.
आरोपींमध्ये राखीव दलातील जवान, हिंगोली जिल्हा पोलिस दलातील एका कर्मचार्यासह सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश
नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहा निरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने शनिवारी रात्रीच्या सुमारास झन्ना मन्ना जुगारावर मारलेल्या छाप्यात १८ आरोपींचा समावेश आहे. ज्यामध्ये १७ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले तर एकाने पलायन केले. या आरोपीमध्ये राज्यराखीव पोलिस बलगट क्र.१२ मधील धनाजी दहातोंडे तर हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील विठ्ठल काळे व सामाजिक कार्यकर्ते निनाजी कांडेलकर यांचाही समावेश आहे.