विवाहाला चारच महिने; पती, सासू-सासऱ्यांविरोधात काळेपडळ पोलिसांत गुन्हा दाखल
पुण्यातील वडाचीवाडी परिसरात नवविवाहित IT इंजिनिअर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विवाहाला अवघे चार महिने झाले असतानाच वैष्णवी ओंकार गिसरे (वय 24) हिने गुरुवारी रात्री वृंदावन सोसायटीतील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर काळेपडळ पोलिसांनी तिचा पती ओंकार संजय गिसरे (वय 28), सासरे संजय महादेव गिसरे (वय 49) आणि सासू रुपाली संजय गिसरे (वय 42), तिघेही रा. वृंदावन सोसायटी, वडाचीवाडी, पुणे, यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर हुंडा प्रतिबंधक कायदा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
मृत वैष्णवीचे वडील प्रवीण रघुनाथ जरांडे (वय 51, रा. कोडीत खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वैष्णवी आणि ओंकार यांचा विवाह 9 मे 2026 रोजी झाला होता. लग्नासाठी माहेरच्या कुटुंबीयांनी सुमारे 45 लाख रुपये खर्च केले होते. याशिवाय वैष्णवीला 10 तोळे सोनेही देण्यात आले होते.
मात्र विवाहानंतर काही दिवसांतच चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून आणखी 5 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या पैशांच्या मागणीवरून वैष्णवीचा मानसिक तसेच शारीरिक छळ केला जात असल्याचे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.
सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित त्रासाला कंटाळून वैष्णवीने गुरुवारी रात्री टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काळेपडळ पोलीस करत आहेत.