कृष्ण जन्माष्टमीच्या धार्मिक कार्यक्रमाला शेकडो भाविकांची उपस्थिती; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
मानोरा : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरी खुर्द तीर्थक्षेत्री कृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांना मोठी उपस्थिती लाभली. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी, ५ सप्टेंबर रोजी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी उमरी खुर्द येथे हजेरी लावली. यावेळी त्यांनी संत जेतालाल महाराज आणि सामकी माता यांचे दर्शन घेत समाजबांधवांशी संवाद साधला.
यावेळी धर्मगुरु यशवंत महाराज यांनी आरदास गायन करून भोग-भंडारा देवी-देवतांना अर्पण केला. संत नगरी उमरी खुर्द येथील संत जेतालाल महाराज मंदिर संस्थानात दरवर्षी गोकुळ अष्टमीनिमित्त महिनाभर भजन संध्येसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही हा धार्मिक सोहळा हर्षोल्हासात पार पडला.
गोकुळ अष्टमीच्या दिवशी प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवचैतन्य नांदो, अशी प्रार्थना श्रीनारायण भगवान श्रीकृष्ण चरणी करण्यात आली. धर्मगुरु यशवंत महाराज यांच्या हस्ते श्रीकृष्ण जन्म सोहळा पार पडला. यानंतर गोपाळकाला आणि दहीहंडीचा मंगल पर्व कार्यक्रमही उत्साहात साजरा करण्यात आला.
कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी संत जेतालाल महाराज मंदिरात आयोजित भजन संध्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह खा. संजय देशमुख यांनी उपस्थिती लावली. दोन्ही मान्यवरांनी देवी-देवतांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी धर्मगुरु यशवंत महाराज, धर्मगुरु जितेंद्र महाराज, भाजपाचे पदाधिकारी राजु राजे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक, भाजपा पोहरादेवी मंडळाचे अध्यक्ष गणेश जाधव यांच्यासह शेकडो भाविक, भक्त आणि समाजबांधव उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.