Stray Cattle

शेकडो मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; नगरपंचायतीने पाठवली केवळ १० जनावरे!

कोरची शहरात शेकडो मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर झाला असून, चार-पाच वर्षांपासून निवेदने देऊनही समस्या कायम आहे. नगरपंचायतीने केवळ १० जनावरे गोशाळेत पाठवल्याने नागरिक संतप्त आहेत.

शेकडो मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; नगरपंचायतीने पाठवली केवळ १० जनावरे!

Stray Cattle

चार-पाच वर्षांपासून निवेदने देऊनही प्रश्न कायम; शेतपिकांचे नुकसान, वाहतुकीला अडथळा — कोरचीकरांचा संताप

कोरची : कोरची शहराच्या चारही बाजूंच्या रस्त्यांवर तसेच शहरातील विविध भागांत शेकडो मोकाट जनावरे ठाण मांडून बसत असल्याने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. ही जनावरे शेतकऱ्यांच्या शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत असून, रस्त्यांवरच वावरत असल्याने वाहनचालक, पादचारी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोकाट जनावरांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, या गंभीर समस्येचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी मागील चार-पाच वर्षांपासून नागरिकांनी कोरची नगरपंचायतीकडे वारंवार निवेदने देऊन मागणी केली आहे. त्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने दोन-तीन वेळा कारवाई करून काही मोकाट जनावरे कोंडवाड्यात टाकली. मात्र, कोंडवाड्यात ठेवलेल्या जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने काही दिवसांतच त्यांना पुन्हा सोडून देण्यात आले.

विशेष म्हणजे, मागील वर्षी कोंडवाड्यात चारा-पाण्याअभावी दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न हाताळताना केवळ जनावरे पकडणे नव्हे, तर त्यांच्यासाठी चारा-पाणी, निवारा आणि योग्य व्यवस्थापन करणेही तितकेच आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शेकडोंचा प्रश्न, कारवाई मात्र केवळ दहा जनावरांवर!

यंदा पुन्हा नगरपंचायतीने मोकाट जनावरांविरोधात कारवाई करत २५ ऑगस्ट २०२६ रोजी रहदारीच्या रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे पकडून कोंडवाड्यात ठेवली. संबंधित जनावरांच्या मालकांनी दंड भरून आपली जनावरे परत घेऊन जावीत, यासाठी नगरपंचायतीकडून वृत्तपत्रात जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, एकही संबंधित मालक पुढे न आल्याने अखेर कोंडवाड्यातील जनावरे गोशाळेत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार ८ सप्टेंबर २०२६ रोजी कोंडवाड्यातील एकूण १० जनावरे ज्ञान फाउंडेशन, गराडा, लाखनी, जि. भंडारा येथील गोशाळेत सुरक्षितपणे रवाना करण्यात आली.

मात्र, कोरची शहराच्या चारही बाजूंना शेकडोच्या संख्येने मोकाट जनावरे फिरत असताना केवळ १० जनावरे गोशाळेत पाठविणे म्हणजे ‘ऊंटाच्या तोंडात जिरे’ ठरणार नाही का?, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

एका बाजूला मोकाट जनावरे शेतात घुसून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला रस्त्यांवर जनावरे बसल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अचानक रस्त्यावर येणाऱ्या जनावरांमुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न हा आता केवळ जनावरांचा प्रश्न राहिलेला नसून शेतकरी, वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न बनला आहे.

दहा जनावरांची गोशाळेत रवानगी; उर्वरित शेकडोचे काय?

नगरपंचायतीने केलेल्या १० जनावरांच्या कारवाईचे स्वागत करतानाच नागरिकांनी प्रशासनाला अनेक प्रश्न विचारले आहेत. उर्वरित शेकडो मोकाट जनावरांचे काय? त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त कधी होणार? शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान थांबणार कसे? रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न कधी सुटणार? आणि भविष्यात एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची?

नगरपंचायतीने आता केवळ तात्पुरती कारवाई न करता मोकाट जनावरांची संख्या निश्चित करून टप्प्याटप्प्याने सर्व जनावरे पकडावीत, त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच कोंडवाडा अथवा गोशाळेत चारा-पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

चार-पाच वर्षांपासून निवेदने देऊनही मोकाट जनावरांचा प्रश्न कायम असताना आता केवळ दहा जनावरे गोशाळेत पाठवून प्रशासनाची जबाबदारी संपणार का? असा संतप्त सवाल कोरचीकरांकडून उपस्थित केला जात आहे.

मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, शेतकऱ्यांचे नुकसान थांबवा आणि नागरिकांची रस्त्यावरील सुरक्षितता सुनिश्चित करा, अशी जोरदार मागणी आता कोरची शहरातील नागरिकांकडून होत आहे.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नऊ शेळ्या दगावल्याने कुटुंबावर आर्थिक संकट

अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नऊ शेळ्या दगावल्याने कुटुंबावर आर्थिक संकट

Small Farmers Crisis: तालुक्यातील पिंपळदरी येथील भूधारक शेतकऱ्यांच्या नऊ शेळ्या अचानक एका दहा मिनिटात दगावल्याने मोठी आर्थिक हानी झाली असून सदर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

Oct 04, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026