सिंदेवाही (Sindewahi Crops Risk) : भात उत्पादक तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंदेवाही तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पावसाचे सलग चार नक्षत्र कोरडे गेल्याने तालुक्यातील नदी, नाले, तलाव आणि बोड्या कोरड्या पडल्या असून, हाताशी आलेली धान पिके डोळ्यांदेखत करपू लागल्याने शेतकरी वर्ग प्रचंड चिंतातूर झाला आहे.
नक्षत्रांनी दिली हुलकावणी, रोपे करपायला सुरुवात
भात (धान) हे सिंदेवाही तालुक्यातील मुख्य पीक असून या (Sindewahi Crops Risk) पिकाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते. मे महिन्याच्या अखेरीस रोहिणी नक्षत्राला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने शेतीच्या कामांना सुरुवात केली होती. मात्र, रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले. त्यानंतर लागलेल्या मृग नक्षत्रात जो काही तुरळक पाऊस झाला, त्यावर शेतकऱ्यांनी धाडस करून आवत्या (पेरणी) केल्या आणि धानाचे पर्हे टाकले. तुरळक पाण्यावर ही पिके चांगली अंकुरूनही आली.
परंतु, त्यानंतर आलेल्या आर्द्रा नक्षत्राने शेतकऱ्यांना पूर्णपणे हुलकावणी दिली. आता पावसाचे चौथे पुनर्वसु नक्षत्र सुरू झाले आहे, मात्र अजूनही पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. कडक ऊन आणि पाण्याचा अभाव यामुळे आता धानाची पिके आणि शेताच्या धुऱ्यावर लावलेली तुरीची झाडे करपून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
जलस्रोत कोरडे; सिंचनाचा प्रश्न गंभीर
सततच्या कोरड्या हवामानामुळे तालुक्यातील पारंपरिक जलस्रोत कमालीचे आटले आहेत. तालुक्यातील लहान-मोठे तलाव, बोड्या, नदी आणि नाले कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीतही कमालीची घट झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची साधने आहेत, त्यांनाही विजेच्या लपंडावामुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे पिके वाचवणे कठीण झाले आहे.
"हजारो रुपये खर्च करून पेरणी केली, पर्हे टाकले. अंकुरलेले धान पाहून आशा पल्लवित झाल्या होत्या. पण आता महिना उलटूनही पाऊस नसल्याने डोळ्यांदेखत पिके करपताना पाहून ऊर फाटून येतोय. निसर्गाने आता तरी कृपा करावी, नाहीतर जगायचं कसं हाच मोठा प्रश्न आहे."
- एक व्यथित शेतकरी, सिंदेवाही तालुका.
आता केवळ वरुणराजाच्या कृपेची प्रतीक्षा
चारही नक्षत्र कोरडे गेल्याने सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी राजा हवालदील झाला आहे. (Sindewahi Crops Risk) दुबार पेरणीचे संकट ओढवल्यास त्याचा खर्च कसा पेलवायचा, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. आता संपूर्ण तालुक्याचे डोळे आभाळाकडे लागले असून, या संकटातून केवळ वरुणराजाचा जोरदार पाऊसच वाचवू शकतो, अशी भावना व्यक्त होत आहे. तसेच प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तालुक्यातील पिकांची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.