मोजणीला ग्रामस्थांचा ठाम नकार; ‘शक्तिपीठ महामार्ग रद्द’च्या घोषणा
कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने मोजणी करण्यासाठी आलेल्या महसूल विभागाच्या पथकाला शेतकरी व ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. ग्रामस्थांनी मोजणीस स्पष्ट नकार दिल्याने अधिकाऱ्यांना मोजणी न करताच परतावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने २२ सप्टेंबर रोजी सिंदगी येथे महसूल विभागाचे पथक मोजणीसाठी दाखल झाले होते. याची माहिती मिळताच गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
‘एकच जिद्द, शक्तिपीठ महामार्ग रद्द’ अशा घोषणा देत ग्रामस्थांनी मोजणीस विरोध दर्शविला. शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत कोणत्याही प्रकारची मोजणी होऊ देणार नाही, तसेच प्रशासनाच्या कोणत्याही कार्यवाहीला सहकार्य करणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
या वेळी गावातील लोकप्रतिनिधींसह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मोजणीच्या कामासाठी मंडळ अधिकारी के. बी. पावडे, शिरस्तेदार आर. ए. शेख, तलाठी विकास पंडित यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मात्र, ग्रामस्थांनी मोजणी करण्यास स्पष्ट नकार दिल्याने प्रशासनाला आपली कार्यवाही थांबवावी लागली.
ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे अखेर महसूल विभागाच्या पथकाला मोजणी प्रक्रिया अर्धवट सोडून परत जावे लागले.