पाईपलाईन फोडून आठ दिवस उलटले; नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
कळमनुरी (Kalamnuri Municipal Council) : शहरातील डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवसांपासून नळाद्वारे पाणीपुरवठा झालेला नाही. पाईपलाईन फुटून आठ दिवसांचा कालावधी उलटूनही ती दुरुस्त करण्याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
काम सुरू असताना नगरपालिका प्रशासनाचा (Kalamnuri Municipal Council) संबंधित अधिकारी घटनास्थळी उपस्थित नसल्याने गुत्तेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून, सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या प्रकारामुळे नगरपालिका प्रशासन आणि संबंधित गुत्तेदाराच्या कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून उद्या सकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून पाणीपुरवठ्याची समस्या सोडवली नाही, तर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विनोद बांगर यांनी दिला आहे. आठ दिवसांपासून पाण्यासाठी नागरिकांची फरफट सुरू असताना (Kalamnuri Municipal Council) नगरपालिका प्रशासन नेमकी कोणती कार्यवाही करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.