प्लॉटींग व्यवहारातील वाद; चार जणांवर पूर्णा पोलिसात गुन्हा
परभणी (Parbhani Suicide Case) : पूर्णा तालुक्यातील राहटी पुलावरुन उडी घेत आत्महत्या केल्याच्या प्रकरणात पूर्णा पोलिसात चार जणांवर ७ ऑगस्ट रोजी गुन्ह्याची नोंद झाली आहे. सासरा, मेव्हण्यांच्या आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळून व्यवसायिकाने आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. प्लॉटींग व्यवहारातून सदर घडली.
माधुरी कवले यांनी तक्रार दिली आहे. बालाप्रसाद शिवदासआप्पा कवले यांनी २ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास फिर्यादीला फोन करुन राहटी पुलावरुन उडी घेऊन आत्महत्या करत असल्याचे सांगितले. या बाबत त्यांनी मोठ्या भावालाही माहिती दिली होती. बालाप्रसाद कवले यांचा सासरे आणि मेव्हण्यांसोबत प्लॉटींगचा व्यवहार होता. त्यांच्या परस्पर व्यवहार केला जात होता. या विषयी विचारणा केल्यावर संबंधित व्यक्ती कवले यांना शिवीगाळ करत हीन वागणूक देत होते. विक्री झालेल्या प्लॉटची २५ टक्के रक्कम देत नव्हते. पैसे मागितल्यावर मानसिक त्रास देवून तु मरुन जा, मेल्यावर पैसे देतो, असे म्हणत त्रास देत होते.
या बाबत बालाप्रसाद यांनी पत्नीला तुझ्या वडिलांनी व सावत्र भावांनी मिळून आपली दिशाभूल केली आहे, त्यामुळे मला मानसिक त्रास होत आहे, असे सांगितले. याच त्रासाला कंटाळून त्यांनी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. (Parbhani Suicide Case) आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी वैजनाथ चन्ने, गंगाधर वैजनाथ चन्ने, मन्मथ वैजनाथ चन्ने, किशोर उर्फ कान्हा वैजनाथ चन्ने यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. तपास सपोनि. गजानन पाटील करत आहेत.