हिंगोलीत अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या रेती माफियाची पोलिसांनी उतरवली मस्ती, कारवाईनंतर खळबळ

उपविभागीय अधिकाऱ्यांवरच दादागिरी करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रेती माफियाचा गोरेगाव पोलिसांनी चांगलाच माज उतरवला आहे.

हिंगोलीत अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या रेती माफियाची पोलिसांनी उतरवली मस्ती, कारवाईनंतर खळबळ

Sand Mafia Arrest

रेती माफिया संजय गोटेच्या क्षमायाचनेचा पोलिसांनी केला व्हिडिओ व्हायरल

हिंगोली (Sand Mafia Arrest) : उपविभागीय अधिकाऱ्यांवरच दादागिरी करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रेती माफियाचा गोरेगाव पोलिसांनी चांगलाच माज उतरवला आहे. विदर्भातून अवैध रेतीची वाहतूक करून महसूल पथकाला अडवणाऱ्या संजय रामचंद्र गोरे याला पोलिसांनी घटनास्थळीच मुसक्या आवळून ताब्यात घेतल्यानंतर त्याची मस्ती जिरवली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध रेती व्यवसाय करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

14 मे रोजी मध्यरात्री सेनगाव तालुक्यातील गोरेगाव चौफुलीवर उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्यासह महसूल पथकाने अवैध रेतीचा टिप्पर पकडला होता. शासनाचा कर चुकवून एमएच 37 टी 9949 क्रमांकाच्या टिप्परमधून वाळू वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. टिप्पर पोलिस ठाण्यात नेण्याचे आदेश दिल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव येथील संजय रामचंद्र गोटे हा बोलेरो जीप घेऊन तेथे पोहोचला. त्याने जीप टिप्परसमोर आडवी लावून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. टिप्पर चालक समाधान राऊतला पळवून लावत घुटुकडे यांना अर्वाच्य शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. टिप्पर डिझेल टाकून जाळून टाकण्याचीही धमकी त्याने दिली होती.

मात्र घुटुकडे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ गोरेगाव पोलिसांना पाचारण केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे व उपनिरीक्षक नितेश लेनगुळे यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा फौजफाटा पाहताच त्याने काही वेळ पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची केली. दबंगगिरी करणाऱ्या संजय गोटेला पोलिसांनी जागेवरच ताब्यात घेत कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला. 15.20 लाख रुपये किमतीचा टिप्पर व रेतीही जप्त करण्यात आली.

या प्रकरणात उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांनी 15 मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून संजय रामचंद्र गोटे व फरार चालक समाधान राऊत या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, धमकी देणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल यंत्रणेवर जरब बसवू पाहणाऱ्या संजय गोटे या रेती माफियाला पोलिसांनी तात्काळ गजाआड केले. त्यानंतर फरार असलेल्या समाधान राऊत यालाही अटक करण्यात आली. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, रेती माफिया संजय गोटे याची गोरेगाव पोलिसांनी चांगलीच मस्ती जिरवल्यानंतर त्याने चक्क पोलिसांसमोर हात जोडून उपविभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत घरगुती कारणातून तसेच मनस्थिती बरोबर नसल्याच्या कारणावरून केलेल्या गैरवर्तनाबद्दल क्षमा याचना मागितली. त्यामुळे ज्या रेती माफियाने गोरेगाव चौफुलीवर महसूल व पोलीस प्रशासनासमोर दबंगगिरी दाखवण्याचा प्रयत्न केला होता, त्यालाच माफी मागण्याची वेळ आल्याने इतर अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुनावणी होऊन दोघांचाही जामीन मंजूर करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये आरोपींनी वापरलेले बोलेरो वाहन क्रमांक एम एच 37 एडी 9949 हे देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे हे करीत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे, जमादार राहुल गोटरे, अनिल भारती, कानबाराव शिंदे, इरफान पठाण, विठ्ठल नवले यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीत प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्याचा साठा जप्त; 4 लाख 71 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

हिंगोलीत प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्याचा साठा जप्त; 4 लाख 71 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या साठवणूक करून चोरटी विक्री करणाऱ्यावर हिंगोली शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Aug 26, 2026
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कळमनुरी पोलिसांची कारवाई

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कळमनुरी पोलिसांची कारवाई

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी कळमनुरी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

Jun 13, 2026
विहिरीच्या कामावरून पिंपळखुटा शिवारात तलवार, रॉड व चाकूने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

विहिरीच्या कामावरून पिंपळखुटा शिवारात तलवार, रॉड व चाकूने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

विहिरीच्या कामाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका वृद्धासह त्यांच्या कुटुंबीयांवर लोखंडी रॉड, तलवार व चाकूने हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे.

Jun 13, 2026
हिंगोलीत अवैध दारूविरोधात मोठी कारवाई; ५५ जणांवर गुन्हे, ४.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोलीत अवैध दारूविरोधात मोठी कारवाई; ५५ जणांवर गुन्हे, ४.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे जिल्ह्यातील विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्यभर सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्री आणि हातभट्टी दारूविरोधात मोठी कारवाई केली आहे

Jun 12, 2026
यशस्वी सापळा कारवाई : खिल्लारच्या तलाठ्याला 14 हजारांची लाच घेताना अटक

यशस्वी सापळा कारवाई : खिल्लारच्या तलाठ्याला 14 हजारांची लाच घेताना अटक

हिंगोली-सेनगाव रोडवरील पुसेगाव फाटा परिसरात गुरुवार, 5 जून 2026 रोजी ही सापळा कारवाई यशस्वी करण्यात आली. 

Jun 06, 2026