हिंगोली (Sakal Maratha Samaj) : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हे सध्या अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करीत आहेत. अनेक दिवस उलटले तरी शासन सकारात्मक निर्णय घेत नाही, त्यामुळे १२ सप्टेंबरला पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात राजकीय पक्षातर्फे आयोजित केलेल्या सभा मेळाव्यावर सकल मराठा समाजाचा बहिष्कार असल्याची माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात (Sakal Maratha Samaj) सकल मराठा समाजातर्फे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत भूषण देशमुख, विनायकराव भिसे पाटील, माधव कोरडे, अॅड. अमोल जाधव, मनिष आखरे, प्रविण जाधव, बाजीराव इंगोले, अॅड. वैभव शिंदे, गजानन जाधव, अॅड. नवनाथ पारोकर, अॅड. नामदेव सपाटे यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पुढे सांगितले की, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने यापूर्वी अनेक आंदोलन झाले. परंतु सर्वच्या सर्वच आंदोलन सनदशिर मार्गाने करण्यात आले. मराठा समाजातील तरूणांच भल व्हाव या उद्देशाने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांची धडपड सुरूच आहे. मागील काही दिवसापासून त्यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
परिणामी त्यांची प्रकृति गंभीर होत आहे. त्यामुळे शासनाने लवकर निर्णय घेऊन मराठा आरक्षणाचा मार्ग मार्गी लावावा विशेष म्हणजे अनेक आयोगाचे जवळपास ८० टक्के निकष आरक्षणाच्या बाजूने आहेत. परंतु आरक्षण देण्याकरीता चालढकल केली जात आहे. १२ सप्टेंबरला पुढील आंदोलनाची रुपरेषा ठरणार असल्याने जिल्ह्यातून जवळपास ५० हजार मराठा सेवक अंतरवाली सराटी येथे जाणार असल्याने त्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात आले.