चामोर्शी मार्गावरील बीएससी महाविद्यालयाजवळ घटना; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
गडचिरोली : शहरातील चामोर्शी मार्गावर बीएससी महाविद्यालयाजवळ पाण्याच्या टाकी परिसरात उभ्या असलेल्या स्कार्पिओ वाहनात वैद्यकीय महाविद्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले केतन पोचमपल्लीवार मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. रविवारी सकाळी वाहन उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्कार्पिओ वाहन नेहमीच्या ठिकाणी उभे होते. सकाळी वाहनमालक रोहित सादुलवार हे वाहन उघडण्यासाठी गेले असता त्यांना केतन पोचमपल्लीवार यांचा मृतदेह वाहनामध्ये आढळला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे पाठविण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार, केतन हे नियमितपणे मद्यसेवन करीत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ते संबंधित वाहनात नेमके कधी गेले आणि कोणत्या परिस्थितीत ते वाहनात बसले, याची माहिती वाहनमालकालाही नव्हती. सकाळी वाहन उघडल्यानंतरच केतन मृतावस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागील परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, केतन यांचा मृतदेह ज्या वाहनात आढळला, त्या वाहनाचे मालक रोहित सादुलवार यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबाबतही माहिती समोर आली आहे. त्यांचे वडील वनविभागातील सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांचे निधन झाले असून, त्यांची आई पोलीस विभागात कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भातील अधिकृत आणि सविस्तर माहिती मात्र अद्याप पोलिस विभागाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
मृत्यू नैसर्गिक की अन्य कारणाने?
केतन पोचमपल्लीवार यांचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला की अन्य कोणत्या परिस्थितीत, हे अद्याप निश्चित झालेले नाही. घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण करण्यात आला असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पोलिस तपासाला पुढील दिशा मिळणार आहे.
पोलिसांच्या मौनामुळे चर्चेला उधाण
घटना समोर आल्यानंतर दिवसभर पोलिस विभागाकडून या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नसल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याने तपासाच्या दृष्टीने पोलिसांकडून माहिती गोपनीय ठेवली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या घटनेत घातपात झाला आहे किंवा नाही, याबाबत सध्या कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.
शवविच्छेदन अहवाल तसेच पोलिसांच्या तपासातून केतन पोचमपल्लीवार यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार असून, त्यानंतरच या प्रकरणाचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.