माधवनगरमध्ये शनिवारी दुपारी प्रकार; आधारकार्ड आणण्याच्या बहाण्याने घरी परतला, सुसाईड नोटमधून कारणाचा उल्लेख
पुणे : पुण्याजवळील राजगुरुनगर परिसरातील माधवनगर (ता. खेड) येथे शनिवारी (१९ सप्टेंबर) धक्कादायक घटना घडली. पॅरालिसिसच्या उपचारासाठी बहिणीच्या घरी राहणाऱ्या मामाची २० वर्षीय भाच्याने हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच घरात आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. संदीप वामन गडदे (वय ४३) आणि प्रवीण कैलास कोहिनकर (वय २०, रा. माधवनगर) अशी मृतांची नावे आहेत.
खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तथा पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप गडदे हे अविवाहित होते. त्यांना पॅरालिसिसचा झटका आल्याने मागील दोन महिन्यांपासून उपचार आणि देखभालीसाठी ते माधवनगर येथील आपल्या बहिणीच्या घरी राहत होते.
आजारपणामुळे संदीप यांना मोठा त्रास होत होता. रात्री-अपरात्री ते मोठ्याने आरडाओरड करत असल्याने घरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. या परिस्थितीमुळे प्रवीण त्रस्त झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, याच कारणातून त्याने मामाची हत्या करण्याचे ठरवले.
आईला कामावर सोडल्यानंतर घरी परतला
शनिवारी सकाळी प्रवीणने आधी आपल्या आईला कामानिमित्त वाकी (ता. खेड) येथे सोडले. त्यानंतर आधारकार्ड घरी राहिल्याचे सांगून ते घेण्यासाठी तो पुन्हा माधवनगर येथील घरी आला.
घरी आल्यानंतर त्याने दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर आजारी अवस्थेत असलेल्या संदीप यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात संदीप गडदे यांचा मृत्यू झाला.
हत्येनंतर प्रवीणनेही उचलले टोकाचे पाऊल
मामाच्या मृत्यूनंतर प्रवीणने त्याच घरात आत्महत्या केली. शेजाऱ्यांना घटनेबाबत संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच खेड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत घटनास्थळाचा पंचनामा केला.
पाहणीदरम्यान पोलिसांना प्रवीणने लिहिलेली सुसाईड नोट आढळली. मामाच्या त्रासाला कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.
पोलिसांकडून सखोल तपास
या प्रकरणी खेड पोलिसांनी मृत प्रवीण कोहिनकर याच्याविरुद्ध खुनाचा आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेमागील परिस्थिती, हत्येचे नेमके कारण आणि इतर संबंधित बाबींचा पोलीस तपास करत आहेत.