फिर्यादीसह साक्षीदार आणि पंचांनी आरोप नाकारले; २०२० मधील कारागृहातून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल
पुण्यातील खंडणीच्या एका प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. २०२० मध्ये घायवळ कारागृहात असताना खंडणी मागितल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता. मात्र, सुनावणीदरम्यान फिर्यादीनेच मूळ आरोप नाकारल्याने तसेच अन्य साक्षीदार आणि पंचांनीही सरकारी पक्षाच्या दाव्याला दुजोरा न दिल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणात संतोष धुमाळ याच्यावर फिर्यादीच्या भावाच्या रॅलीसाठी जीप उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली खंडणी मागितल्याचा आरोप होता. गुन्हे शाखेने तपास करत हा गुन्हा उघडकीस आणला होता. मात्र, न्यायालयीन सुनावणीदरम्यान फिर्यादी आपल्या पूर्वीच्या आरोपांपासून मागे हटला.
फिर्यादीने न्यायालयात दिलेल्या जबाबात, पोलिसांच्या दबावामुळे आपल्याकडून तक्रार नोंदवून घेण्यात आल्याचा दावा केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नोंदवण्यात आलेल्या जबाबातही त्याने अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले. खटल्यादरम्यान अन्य साक्षीदार तसेच पंच साक्षीदारांनीही आरोपांना दुजोरा दिला नाही. त्यामुळे उपलब्ध पुरावे आरोपींविरोधात पुरेसे नसल्याचे समोर आल्याने विशेष मोक्का न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
निलेश घायवळ सध्या देशाबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी पुण्यातील कोथरुड परिसरात एका व्यक्तीवर गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणात घायवळ टोळीचा सहभाग असल्याची माहिती समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीविरोधात मकोका कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली होती.
मात्र, पोलिसांच्या या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर निलेश घायवळ देशाबाहेर गेल्याचे सांगण्यात आले. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. पासपोर्टसाठी अर्ज करताना त्याने आडनावामध्ये ‘घायवळ’ऐवजी ‘गायवळ’ असा उल्लेख केल्याचे तपासात आढळले. याच बदलाचा फायदा घेत तो युरोपमध्ये गेल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी २०२१ मध्ये पुण्यातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात निलेश घायवळला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्याच्यावर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर २०२२ मध्ये न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. जामीन देताना न्यायालयाने त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश दिले होते.
मात्र, घायवळने पासपोर्ट पोलिसांकडे जमा केला नसल्याचे समोर आले. त्याच पासपोर्टच्या आधारे त्याने सप्टेंबर महिन्याच्या मध्यात तीन महिन्यांचा व्हिसा मिळवून युरोपला प्रवास केल्याचे सांगण्यात आले. सध्या तो देशाबाहेर असल्याची माहिती आहे.