धर्मांतराच्या आरोपांप्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच वैवाहिक वाद विकोपाला; न्यायालयाकडून निदा खानला समन्स
नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील तरुणी आणि तरुणाच्या कथित धर्मांतर प्रकरणात संशयित आरोपी म्हणून नाव समोर आलेल्या निदा एजाज खानसमोरील कायदेशीर अडचणी कायम असतानाच तिच्या वैवाहिक आयुष्यातही मोठा पेच निर्माण झाला आहे. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या निदा खानविरोधात तिच्या पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जाची न्यायालयाने दखल घेत निदाला समन्स बजावले असून, १६ ऑक्टोबर रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
निदा खानचे नाव २६ मार्चपासून संबंधित गंभीर गुन्ह्यांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यातही तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. आता पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतल्याने या प्रकरणाला आणखी एक कौटुंबिक वळण मिळाले आहे.
दोन वेगवेगळ्या तक्रारींवरून गुन्हे दाखल
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बहुराष्ट्रीय कंपनीतील एका तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हानिफ शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय, मुंबई नाका पोलीस ठाण्यात याच कंपनीतील एका तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि निदा खान यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या दोन्ही प्रकरणांमध्ये नाशिकरोड आणि नाशिक जिल्हा न्यायालयाने निदा खानला सशर्त जामीन मंजूर केला आहे. संबंधित प्रकरणांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
बदनामी आणि कौटुंबिक तणावाचा दावा
निदा खानचे लग्न दोन ते तीन वर्षांपूर्वी झाले होते, अशी माहिती आहे. २६ मार्चनंतर तिचे नाव या प्रकरणांमध्ये आल्यानंतर तपास, न्यायालयीन कारवाई आणि त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक चर्चेमुळे तिच्या वैवाहिक आयुष्यात तणाव वाढल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणामुळे झालेली बदनामी आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तिच्या पतीने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एका बाजूला न्यायालयीन लढाई आणि दुसऱ्या बाजूला गर्भावस्था तसेच वैवाहिक वाद, अशा अनेक आव्हानांना निदा खानला सामोरे जावे लागत आहे.
जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी न्यायालयाचे बाळाच्या हितावर निरीक्षण
दरम्यान, निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने बाळाच्या हिताचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे नमूद केले होते. नवजात बाळाला तुरुंगातील वातावरणात राहण्याची वेळ येऊ नये, या मानवी दृष्टिकोनातून न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते.
या सुनावणीदरम्यान न्यायालयाने भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा संदर्भ देत बाळाच्या हिताबाबत संवेदनशील भूमिका मांडली होती. त्यानंतर निदा खानला जामीन मंजूर झाला होता.
मात्र, आता बाळाच्या जन्माला अवघे काही महिने शिल्लक असताना पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या अर्जावर पुढील सुनावणी १६ ऑक्टोबर रोजी होणार असून, त्यासाठी निदा खानला न्यायालयात उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.