पुराणमल मेहरा यांचा वडिलांना शेवटचा संदेश; कौटुंबिक वाद आणि पोस्टिंगच्या तणावाचा पोलिसांना संशय, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
मुंबई : दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरातील नेव्ही नगरमध्ये नौदल अधिकारी पुराणमल मेहरा (वय 30), त्यांची पत्नी ओमा, मुलगा यश आणि दोन महिन्यांचे बाळ मृतावस्थेत आढळल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात पुराणमल मेहरा यांनी कुटुंबातील तिघांचा विषप्रयोगातून मृत्यू घडवून आणल्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ही घटना 14 ऑगस्टच्या रात्री घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी पुराणमल मेहरा यांनी आपल्या वडिलांना “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना” असा शेवटचा मेसेज पाठवला होता. कुटुंबीयांनी हा संदेश दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिल्यानंतर नेव्ही कंट्रोल रूमला माहिती दिली.
माहिती मिळताच नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पुराणमल मेहरा यांच्या नेव्ही नगरमधील राहत्या घरात प्रवेश केला. त्यावेळी पुराणमल गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर त्यांची पत्नी ओमा आणि दोन मुले मृतावस्थेत आढळली. शनिवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली.
या प्रकरणाचा नौदल आणि कफ परेड पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत पुराणमल मेहरा यांच्यावर मानसिक तणावासाठी उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच घरातील कौटुंबिक वाद आणि पोस्टिंगशी संबंधित तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून शेजाऱ्यांकडेही चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीतून पोलिसांच्या हाती काही प्राथमिक माहिती लागली आहे. दरम्यान, चौघांचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक स्पष्ट होणार आहे.
सध्या नौदल आणि मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, कुटुंबातील घडामोडी, पुराणमल मेहरा यांच्यावरील मानसिक ताण आणि पोस्टिंगशी संबंधित परिस्थिती यांचा तपास केला जात आहे.