किनगाव राजा हद्दीतील तरुणाच्या हत्येचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा; जुन्या वादातून रचला होता कट
बुलढाणा : किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तढेगाव शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाच्या हत्येचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या पाच तासांत छडा लावला. मृतकाची ओळख पटवून पोलिसांनी या प्रकरणातील चार आरोपींना अटक केली आहे. जुन्या वादातून एक लाख ५० हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती. त्यानंतर दारूमध्ये विष मिसळून तरुणाची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
साकेगाव (ता. चिखली) येथील रहिवासी रमेश सांडूसिंग परिहार (वय ६५) यांनी याप्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचा मुलगा उमेश रमेश परिहार (वय ३८, रा. साकेगाव) हा ९ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या मुलांना भेटण्यासाठी ग्राम मडाखेड येथे गेला होता. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी उमेश हा तढेगाव (ता. सिंदखेड राजा) शिवारात मृतावस्थेत पडल्याची माहिती तक्रारदारांना मिळाली.
माहिती मिळाल्यानंतर रमेश परिहार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तढेगाव शिवारातील रस्त्याच्या कडेला असलेल्या सोयाबीनच्या शेतात उमेश परिहार याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या चेहऱ्यावर सूज होती, नाक व तोंडातून रक्तस्राव झालेला दिसत होता, तसेच डोक्याला मुका मार लागल्याचे आढळले. तक्रारदारांनी उतरादा पेठ येथील गणेश राजपूत याच्यावर संशय व्यक्त केला. गणेश राजपूत याने साथीदारांच्या मदतीने उमेशची हत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला.
या तक्रारीवरून किनगाव राजा पोलीस ठाण्यात अप. क्र. ३२६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. पथकाने भौतिक तसेच तांत्रिक तपासाच्या माध्यमातून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
११ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिसांनी मृतकाची ओळख निश्चित केली. त्यानंतर तपासातून चार संशयित आरोपी निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, उमेश परिहार आणि उतरादा येथील गणेश राजपूत यांच्यात गेल्या काही काळापासून वाद सुरू होता. या वादातून उमेशचा कायमचा काटा काढण्याचा गणेश राजपूत याने निर्णय घेतला. त्यासाठी त्याने सागर पवार याच्यामार्फत नयीमखाँ पठाण आणि गणेश काळे महाराज यांना एक लाख ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
९ सप्टेंबर रोजी गणेश राजपूत आणि गणेश काळे हे उमेश परिहार याला सोबत घेऊन निघाले. पुढे साखरखेर्डा येथून सागर पवार आणि नयीमखाँ पठाण यांनाही सोबत घेण्यात आले. त्यानंतर चौघे उमेशला घेऊन लोणार येथे गेले. तेथे सर्वांनी जेवण केले आणि उमेशला दारू पाजण्यात आली.
यानंतर गणेश काळे महाराज याने उमेशच्या दारूच्या बाटलीत विष मिसळले. ही विषारी दारू उमेशला पाजल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर मृतदेह तढेगाव शिवारातील घनश्याम कुटे यांच्या सोयाबीनच्या शेतात नेऊन टाकण्यात आला.
अटक करण्यात आलेले आरोपी :
१. गणेश मोतीसिंग राजपूत (वय ३९ वर्षे, रा. उतरादा, ता. चिखली)
२. गणेश पुंजाजी काळे (वय ४२ वर्षे, रा. सारस्वती, ता. लोणार)
३. नयीम खाँ उमर खाँ पठाण (वय ५० वर्षे, रा. ईसोली, ता. चिखली)
४. सागर प्रकाश पवार (वय ५० वर्षे, रा. उतरादा, ता. चिखली, जि. बुलढाणा)
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे (देऊळगाव राजा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कामगिरी केली.
या पथकात सपोनि. संजय मातोंडकर (पो.स्टे. किनगाव राजा), पोउपनि. प्रताप बाजड, सफौ. राजेंद्र अंभोरे, पोहेकॉ. शरदचंद्र गिरी, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, पोकॉ. अमोल अंभोरे, पोकॉ. राजेंद्र गडकर, मपोकॉ. पूजा जाधव, चापोकॉ. विलास भोसले (सर्व स्था.गु.शा. बुलढाणा), पोहेकॉ. राजू आडवे (तांत्रिक विश्लेषण विभाग, बुलढाणा), पीएसआय सुरेश जारवाल (वाचक), पोकॉ. अभिजीत ठाकरे (उपविपोअ कार्यालय, देऊळगाव राजा), पोकॉ. उमेश राजपूत (ता.जि.वि.शा. चिखली), तसेच पोकॉ. सुभाष गिते, गणेश वारकरी, मिलिंद सानपसारे आणि संदीप डोंगरे (पो.स्टे. किनगाव राजा) यांचा समावेश होता.
या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. संजय मातोंडकर करीत आहेत.